घटस्फोटावर शाहिद कपूरच्या आईचा मोठा खुलासा; म्हणाल्या “त्यांचं मुंबईत जाणं..”
नीलिमा अझीम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पंकज कपूर यांच्याशी घटस्फोटाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. या घटस्फोटामागचं कारणसुद्धा त्यांनी सांगितलं. नीलिमा यांच्याशी घटस्फोटानंतर पंकज यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्याशी दुसरं लग्न केलं.

अभिनेत्री नीलिमा अझीम आणि पंकज कपूर ही हिंदी सिनेसृष्टीतील अशी जोडी आहे, ज्यांनी अत्यंत आदरपूर्वक पद्धतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. नीलिमा आणि पंकज कपूर यांनी 1979 मध्ये लग्न केलं होतं. परंतु लग्नानंतर त्यांच्यात खटके उडू लागले होते आणि 1984 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या बऱ्याच वर्षांनंतर आता नीलिमा यांनी त्यावर मोकळेपणे भाष्य केलं. विक्की लालवानीच्या पॉडकास्टमध्ये नीलिमा यांनी पंकज यांच्यासोबतचं नातं कसं होतं, याविषयी व्यक्त झाल्या. “लग्न कोणी विभक्त होण्यासाठी करत नाही ना”, असा थेट सवाल त्यांनी केला.
“लग्न तर नेहमी सोबत राहण्यासाठीच केलं जातं. कोणी विभक्त होण्यासाठी तर लग्न करत नाही ना? पण माझ्या मते कदाचित आम्ही दोघं खूप वेगळे होतो. लग्न म्हणजे फक्त कृती किंवा घटनांबद्दल नाही. तुमचं मन कशात आहे, याबद्दल आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कोणत्या टप्प्यात आहात, याबद्दल आहे. जर ते कंपन एकाच फ्रीक्वेंन्सीवर नसेल, तर गोष्टी ठीक घडत नाहीत”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.
याविषयी शाहिद कपूरच्या आईने पुढे सांगितलं, “मला असं वाटतं की आमच्यात दुरावाही खूप होता. कारण ते मुंबईत होते आणि मी दिल्लीत राहते. तेव्हासुद्धा मी तीच मुलगी होते जी आपल्या आईवडिलांसोबत दिल्लीत राहत होते आणि हे असंच होतं. कदाचित त्यावेळी त्यांच्यासाठी आधी मला सोडून आणि नंतर शाहिदला सोडून मुंबई जाण्याची कल्पना चांगली नव्हती. त्यांनी मला मुंबई जाण्याविषयी विचारलं होतं. मी त्यांना म्हणाले की जा. तुम्ही खूप प्रतिभावान आहात. ते तिथे आपलं करिअर बनवत होते आणि मी दिल्लीत राहत होती. त्यामुळे अनेक वर्षांच्या दुराव्याने आम्हाला कायमचंच दूर केलं. त्यांनी स्पष्ट केलं होतं की सर्वांसोबत मुंबईत शिफ्ट होणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं. त्यामुळे मी त्यांच्यासोबत मुंबईत राहू शकत नव्हते.”
पंकज कपूर यांना घटस्फोट दिल्याचा कोणताच पश्चात्ताप नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. “मी खूप लहान होते, त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या तरुण खांद्यांना ते सांभाळणं खूप कठीण होतं. मी नेहमीच हे सांगते की कदाचित सर्वांनाच हे समजणार नाही. पण मला कोणताही पश्चात्ताप नाही, कारण माझ्याकडे शाहिद आहे. ईशानच्या बाबतही असंच आहे. म्हणून मला कोणताही पश्चात्ताप नाही”, असं त्या म्हणाल्या. नीलिमा यांना घटस्फोट दिल्यानंतर पंकज कपूर यांनी सुप्रिया पाठकशी दुसरं लग्न केलं.
