3 काका घरी यायचे आणि.. 10 वर्षांच्या लेकीनं उघड केलं ‘ते’ गुपित, क्षणार्धात…

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये पत्नीने तीन साथीदारांसह पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली. राहुल नावाच्या व्यक्तीची हत्या करून मृतदेह विल्हेवाट लावण्यात आली. पण दहा वर्षांच्या मुलीच्या धक्कादायक साक्षीतून हे क्रौर्य उघड झाले. 'आई आणि काकांनी माझ्या बाबांना मारले', असे सांगत तिने न्याय मागितला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

3 काका घरी यायचे आणि.. 10 वर्षांच्या लेकीनं उघड केलं ते गुपित, क्षणार्धात...
crime news
| Updated on: Dec 22, 2025 | 1:24 PM

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडासारखा प्रकार घडला आहे. तिथे एका महिलेने तीन तरूणांसह मिळून आपल्याच पतीची निर्घृणपणे हत्या केली. एवढंच नव्हे तर त्यानंतर मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत भरून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले. मात्र अखेर हा गुन्हा उघडकीस आलाच असून या प्रकरणात मृत इसमाच्या अवघ्या 10 वर्षांच्या मुलीने अनेक धक्कादायक गुपितं उघड केली आहेत. ‘आई आणि त्या 3 काकांना फाशी द्या, त्यांनी माझ्या बाबांना मारलंय’, अशी मागणीही त्या चिमुकलीने केली आहे.

खरंतर, 15 डिmeसेंबरच्या सकाळी, पत्रौआ रोडवरील ईदगाहजवळील नाल्यात तुकडे तुकडे झालेला एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्याचं डोकं किंवा शरीराचे इतर भाग नव्हते, पण त्याच्या हाताचा एक तुकडा होता. आणि त्या हातावर “राहुल” असा टॅटू होता. या टॅटूच्या आधारे पोलिसांनी मृत व्यक्तीबद्दल माहिती मिळवली. मृतदेहाची ओळख पटली, तो मृत इसम 40 वर्षांचा राहुल असल्याचे समजले, जो राजपुरा पोलिस स्टेशन परिसरातील गन्ना शहरातील रहिवासी जसवंत यांचा मुलगा होता.

हत्येनंतर घरात सापडले महत्वाचे पुरावे

तपासात असे आढळून आलं की, मृत राहुल हा 18 नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. तो सापडत नाहीये,  अशी तक्रार त्याची पत्नी रुबी हिने 24 नोव्हेंबर रोजी चंदौसी पोलीस ठाण्यात दाखल केली.  मात्र सुरुवातीपासूनच पोलिसांना पत्नीच्या भूमिकेचा संशय आला आणि त्यानंतर सखोल तपास सुरू करण्यात आला. रविवारी, पोलीस घटनास्थळी पुन्हा गेले आणि त्यांनी घरातून एक स्कूटर, एक बॅग, एक टॉयलेट ब्रश, एक लोखंडी रॉड आणि एक इलेक्ट्रिक हीटर असे महत्त्वाचे पुरावे जप्त केले. राहुलची हत्या करण्यासाठी आणि त्याच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी हीच साधने वापरली गेली असावीत, असा पोलिसांना संशय होता.

हात-पाय, डोक्याचा, पोलिसांकडून तपास सुरू

हत्येनंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृत राहुल याचे हात, पाय आणि डोकं यांचा शोध सध्या सुरू आहे. याप्रकरणी राहुलची पत्नी, रुबी, तिचा प्रियकर आणि आणखी एका आरोपीसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे.

10 वर्षांच्या मुलीने उघड केलं गुपित

या संपूर्ण प्रकरणात मृताच्या 10 वर्षांच्या मुलीने सर्वात धक्कादायक खुलासा केला. मुलीने पोलिसांना सांगितलं की, ” माझ्या आईवडिलांमध्ये अनेकदा भांडणं होत असे. गौरव, सौरभ आणि अभिषेक नावाचे दोन पुरुष आमच्या घरी येत असत. ते आमच्यासाठी चॉकलेट आणायचे. माझे वडील बाहेर असताना ते तिघेही माझ्या आईला भेटायला घरी यायचे.”. एवढंच नव्हे तर अभिषेक अनेकदा म्हणायचा, “काही महिन्यांची गोष्ट आहे, मग मी तुझा सांभाळ करेन.” असंही तिने सांगितलं. जेव्हा हे लोक यायचे तेव्हा मला आणि माझ्या भावाला कोणत्या ना कोणत्या कारणाने खोलीबाहेर पाठवले जायचं,अशी माहितीही तिने पोलिसांना दिली.

मुलगी शाळेत गेल्यावर झाली हत्या

त्या मुलीच्या सांगण्यानुसार, ज्या दिवशी तिच्या वडिलांचा खून झाला तेव्हा ती आणि तिचा भाऊ, हे दोघे शाळेत गेले होते. जेव्हा ही मुलं, या तीन जणांना घरात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा त्यांची आई त्यांना धमकावायची.  “माझ्या आईला आणि सर्व आरोपींना फाशी द्यावी” अशी मागणी त्या मुलीने केली आहे. “माझ्या आईला आणि तिन्ही काकांना घेऊन जा, सर्वांना शिक्षा झाली पाहिजे.” असं तिने स्पष्टपणे सांगितलं. या प्रकरणात मुलीचा जबाब सर्वात मजबूत पुरावा म्हणून समोर आला आहे.