
राज्यभरासह मुंबईत विविध गुन्ह्यांच्या घटना वाढतच चालल्या असून रोज काही ना काही धक्कादायक गोष्टी, घटना कानावर येत असतात. असाच एक भयानक प्रकार मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या टिटवाळ्यात घडला आहे. तेथील खडवली येथे गहाण ठेवलेले दागिने परत मिळवण्यासाठी काही लोकांनी गँगस्टर स्टाईलने सोनाराचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. एवढंच नव्हे तर त्याच्याकडूनच 2 लाख रुपये मागितले. पैसे दिले नाहीतर “दरीत फेकून ठार मारू ” अशी धमकीही त्याला देण्यात आली. या घटनेमुळे खडवली परिसरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे. धमकी देणाऱ्यांच्या तावडीतून सुटल्यावर सोनाराने कशीबशी पोलीस ठाण्यात धाव घेत आपबिती कथन केली. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पैसे दे नाहीतर दरीत फेकेन
मिळालेल्या माहितीनुसार. टिटवाळा जवळील खडवली येथे धक्कादायक घटना घडली आहे. गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या वादातून तीन ते चार जणांनी सोनाराला मारहाण केली आणि त्याच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. एवढंच नव्हे तर पैसे न दिल्यास दरीत फेकण्याची देखील धमकी दिली. उगम चौधरी असे या सोनाराचे नाव आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
उगम याचे खडवली येथे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. एका महिलेने चार वर्षांपूर्वी उगम याच्याकडे दागिने गहाण ठेवले आणि काही पैसे घेतले होते . चार वर्षानंतर ही महिला उगमकडे दागिने मागण्यासाठी आली. त्यावेळी उगमने त्यांना सांगितलं की जे पैसे बाकी आहेत ते द्या, मी दोन दिवसात तुमचे दागिने देतो. त्यानंतर ती महिला तेथून निघून गेली, पण काही वेळाने उगमला संजय पाटोळे यांचा फोन आला .त्यानंतर संजय आपल्या दोन साथीदारांसोबत उगमच्या दुकानात आले .त्यांनी उगमला बाहेर बोलवलं आणि आपल्या गाडीत बसवून खडवली पोलीस चौकी पासून काही अंतरावर नेलं, तिथे त्याला बेदम मारहाण केली. तसेच (त्या महिलेचे) दागिने फुकट दे आणि अजून दोन लाख रुपये दे अन्यथा तुला मारून दरीत फेकून देईल अशी धमकी दिली. यामुळे तो सोनार प्रचंड घाबरला आणि त्याने टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार कथन केला. त्याची नोंद घेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली .