वीस रुपये उधारी मागितल्याने तरुण संतापले, चायनीज सेंटर कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

बदलापूरमध्ये एका चायनीज सेंटरवर दोन तरुण चायनीज खायला गेले. तरुणांचे आधीच्या बिलातील 20 रुपये देणे बाकी होते. कर्मचाऱ्यांनी हे पैसे मागितले तरुण संतापले.

वीस रुपये उधारी मागितल्याने तरुण संतापले, चायनीज सेंटर कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला
बदलापूरमध्ये चायनीज सेंटरवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 24, 2023 | 5:29 PM

बदलापूर / निनाद करमरकर : उधारीचे पैसे मागितले म्हणून दोन तरुणांनी चायनीज सेंटरवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना बदलापुरात घडली. या मारहाणीत सदर कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. केवळ 20 रुपयासाठी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आधीच्या बिलाचे 20 रुपये मागितले म्हणून हल्ला

बदलापूर पूर्वेच्या कात्रप परिसरात मिनी चायना गेट नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये दुर्गा नरी भंडारी आणि केशव जगत रोकाया हे दोन कर्मचारी काम करत होते. यावेळी धनसिंग उर्फ धनराज चव्हाण आणि साईनाथ उर्फ पप्पू राठोड हे दोघे तिथे आले. त्यांच्याकडे आधीच्या बिलाचे 20 रुपये बाकी असल्यानं केशव रोकाया याने त्यांच्याकडे पैसे मागितले. पैसे मागितल्याचा राग आल्याने या दोघांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही कर्मचारी जखमी झाले.

उल्हासनगरात लुटीसाठी चौघांवर हल्ला

लूट करण्याच्या उद्देशाने उल्हासनगरात चौघांवर हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चौघां जखमींना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. आरोपींनी चौघांवर हल्ला करत त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे लुटून पोबारा केला.