लाज आणली! विशिष्ट जातीच्या महिलेनं पाणी भरलं म्हणून अख्खा हॅन्डपंप धुवायला लावला

कशा तोडल्या जाणार जातीभेदाच्या भिंती? शिव्या दिल्या, धमकावलं आणि तिने विरोध केल्यानंतर मारहाणही!

लाज आणली! विशिष्ट जातीच्या महिलेनं पाणी भरलं म्हणून अख्खा हॅन्डपंप धुवायला लावला
घरगुती जमिनीचा वाद
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Dec 11, 2022 | 11:20 AM

उत्तर प्रदेश : एका दलित महिलेची छेड काढणं, तिला मारहाण करणं, धमकी देणं आणि तिने वापरलेला हॅन्डपंप धुवून घेण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांत दाद मागूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यानं महिलेला अखेर कोर्टाची पायरी चढावी लागली. कोर्टाने या प्रकरणी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आता पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशच्या बांदा घडला.

बांदा येथील मटौंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. दलित महिला अनुसूचित जातीची असून ती मजुरी करुन आपलं कुटुंब चालवते. 31 ऑक्टोबर रोजी पीडित महिला घरात एकटी होती. त्यावेळी एका व्यक्तीने जबरदस्ती तिच्या घरात घुसून तिच्यासोबत गैरकृत्य केलं.

अश्लील चाळे करणाऱ्या या व्यक्तीला पीडितेनं हटकलं. त्यावरुन या पीडितेला धमकी देत ती व्यक्ती घरातून निघून गेली. यानंतर 3 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास एक अजब प्रकार घडला.

घराजवळच असलेल्या एका हॅन्डपंप मधून महिलेनं पाणी भरलं. त्या दरम्यान, आरोपी आपल्या अन्य काही साथीदारांना घेऊन आला आणि महिलेला जातीवाचक शिवीगाळ करुन लागला. पीडितेनं तक्रारीत आरोपीवर सनसनाटी आरोप केला आहे. पीडितेनं तक्रारीत म्हटलंय की..

तू हॅन्डपंपला स्पर्श केलायस, आणि आम्हाला पाणी भरायचं. त्यामुळे तो हॅन्डपंप आम्हाला धुवून दे, असं त्यांनी म्हटलं. मी विरोध केल्यानंतर त्यांनी मला धमकी दिली. तुझी जवानी उतरवू असं म्हणाले आणि मला मारहाण करु लागले.

पीडितेनं या बाबतची माहिती पोलिसांनाही दिली होती. पण पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पीडितेनं अखेर कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत.आता पोलिसांनी 354, 147, 323 या कलपांसह एससी एसटी कायद्यांतर्गही गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पोलीस आता याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.