
बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी गावात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि महिलांच्या सहकार्याने अवैध दारुविक्री बंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपासून पुन्हा अवैध दारुविक्री सुरु झाली आहे. त्यामुळे गावातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय. अवैध दारुविक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी, यासाठी महिलांनी गावातील अवैद्य दारुविक्री करणाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना समज दिली आहे. तसेच परत दारुविक्री केल्यास कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सर्व महिलांनी एल्गार पुकारला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गावात मागील 15 ते 20 वर्षांपासून अवैध दारुविक्री सुरु होती. ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि महिला बचत गटांनी पुढाकार घेवून दारुविक्री बंद केली होती. अवैध दारुविक्री विरोधात ठरावही घेण्यात आला. पण अवैध दारु विक्रेते ग्रामस्थांच्या निर्णयावर अंमल करुन फक्त काही काळासाठी दारु विक्रीवर प्रतिबंध ठेवत आहेत.
काही दारुडे स्वत:कडे पैसे नसतात तेव्हा आपल्या मुलाबाळांना, पत्नीला तसेच आई-वडिलांना मारहाण करुन घरातील धान्ये आणि भांडी विकून आपली व्यसनपूर्ती करतात. तसेच नवीन पिढीही व्यसनाच्या आहारी जात आहेत. ही अवैध दारुविक्री किती वेळा बंद आणि किती वेळा सुरु होत राहील? असा सवाल नांद्राकोळी येथील महिलांनी उपस्थित केला. तसेच अवैध दारु विक्रेत्यांविरुद्ध काही सुज्ज्ञ नागरिकांमध्येही रोष आहे.
हेही वाचा :
म्हशी पळवण्याचा कार्यक्रम महागात, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल
उपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात