MSBSHSE 12th Result 2023 : आज बारावीचा निकाल… पण बुलढाण्यातील पेपर फुटी प्रकरणातील आरोपींचा निकाल कधी..?

| Updated on: May 25, 2023 | 2:04 PM

Maharashtra Board HSC Result : बारावीची परीक्षा सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातील बारावीच्या केंद्रावरून गणिताचा पेपर फुटल्याने राज्यभरात खळबळ माजली होती. याप्रकरणी काही लोकांना अटकही करण्यात आली होती.

MSBSHSE 12th Result 2023 : आज बारावीचा निकाल... पण बुलढाण्यातील पेपर फुटी प्रकरणातील आरोपींचा निकाल कधी..?
Follow us on

संदीप वानखेडे प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, बुलढाणा  : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ( 12 th result) आज निकाल आहे. मात्र बारावीची परीक्षा सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथील बारावीच्या केंद्रावरून गणिताचा पेपर फुटल्याने (paper leaked) राज्यभरात खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटकही केली होती. या सर्व प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात येऊनही त्याचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारे आरोपी हे जामीनावर मोकाट आहेत. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला तरी पेपर फुटी प्रकरणातील आरोपींचा निकाल कधी..? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

बारावीचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. त्यातील दोन जण संस्था चालक असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली होती. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता सरकारने पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार यांच्या नेतृत्वात एस.आय.टी. सुद्धा स्थापन केली होती. परंतु या एसआयटीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. तर अटक करण्यात आलेले आठ आरोपी हे जामीनावर सुटले आहेत, मात्र यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. एसआयटीची स्थापना करूनही अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे पेपर फुटी प्रकरणातील आरोपींचा निकाल कधी..? असा प्रश्न विचारला जात आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात बोर्डाने पेपर फुटलाच नसल्याची भूमिका घेतली होती मात्र बुलढाण्यातील भारत विद्यालय केंद्रप्रमुखात असलेले शिक्षक गोमटे यांनी पेपर फुटल्याचे नमूद केले होते. तसेच पेपर सुरू असताना माध्यमांच्या कॅमेरासमोर पेपरही दाखवला होता. राज्यात पेपर फुटीच हे मोठं प्रकरण असतानाही अद्याप माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यावर कुठलीही कारवाई केली नसल्याचा समोर आलेले आहे. याचा निकालावर परिणाम होणार आहे. आज बारावीचा निकाल असूनही अद्याप पेपर फुटी प्रकरणी माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाने या पोलिसांनी या प्रकरणावर कुठलीही ठोस कारवाई केली नसल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी सध्या कुठलेच अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.