इयत्ता 11 वीच्या प्रवेश शुल्कात कपात; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

महाराष्ट्रातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल झाले आहेत. आता ही प्रक्रिया संपूर्ण ऑनलाइन होणार आहे आणि नोंदणी शुल्कही कमी करण्यात आले आहे. शाळा आणि महाविद्यालये 15 मेपर्यंत नोंदणी करू शकतात, तर विद्यार्थ्यांची नोंदणी 19 मेपासून सुरू होईल. 15 ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न काही महाविद्यालयांचा प्रवेश स्थगित करण्यात आला आहे.

इयत्ता 11 वीच्या प्रवेश शुल्कात कपात; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: Getty Images
| Updated on: May 10, 2025 | 12:54 PM

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली असून, आता राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे नोंदणी शुल्क मुंबईसाठी वेगळे आणि उर्वरित विभागांसाठी वेगळे होते. त्यानुसार मुंबईसाठी 225 रुपये, तर उर्वरित विभागांसाठी 125 रुपये शुल्क आकारण्यात येत होते.

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2025-26 अंतर्गत प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र नॅक मूल्यांकन व एनबीए साठीची आवश्यक पूर्तता व महाविद्यालय विकास समितीची (सीडीसी) स्थापना न केल्यामुळे विद्यापीठाशी संलग्नित 229 महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तसेच रुपये 10 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. या सर्व संबंधित संलग्न महाविद्यालयांना वेळोवेळी परिपत्रक, सूचना व स्मरणपत्र देऊनही आवश्यक पूर्तता न केल्यामुळे सदर महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. या सर्व महाविद्यालयांची यादी मुंबई विद्यापीठाच्या http:// mu. ac. in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठातर्फे देण्यात आली आहे.

अकरावी प्रवेशासाठी संकेतस्थळ कार्यान्वित

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून 15 मेपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करण्यात येणार असून, 19 मेपासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेशांसाठी https:// mahafyjcadmissions. in हे अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. नवे संकेतस्थळ9 मेपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शाळा, महाविद्यालयांनी 15 मेपर्यंत नोंदणी करून त्याचे प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल 15 मेपूर्वी जाहीर होणे अपेक्षित आहे, तर 19 ते 28 मे या कालावधीत विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे अपेक्षित असून, प्राधान्यक्रमही नोंदवले जाणार आहेत.

अकरावीचे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

अकरावीचे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून सुमारे 16 लाख 76 हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होईल. दर वर्षी दिवाळीपर्यंत सुरू राहणारी इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे उद्दिष्ट आहे. कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग 11 ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील जवळपास 11 हजार 700 कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या सुमारे 16 लाख 76 हजार जागा उपलब्ध होणार असून, या माध्यमातून अकरावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवेशावर लक्ष राहणार आहे.

12वी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये 12वीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, 7 ते 17 में या कालावधीत नियमित शुल्कासह, तर 18 ते 22 मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.