इंजिनिअरिंगला अच्छे दिन, प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली, नेमकं कारण काय?

| Updated on: Nov 24, 2021 | 8:37 AM

गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेल्या अभियांत्रिकी विद्याशाखेला सध्या नव्या अभ्यासक्रमांमुळं अच्छे दिन येत असल्याचं दिसत आहे.

इंजिनिअरिंगला अच्छे दिन, प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली, नेमकं कारण काय?
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेल्या अभियांत्रिकी विद्याशाखेला सध्या नव्या अभ्यासक्रमांमुळं अच्छे दिन येत असल्याचं दिसत आहे. कॉम्प्युटर आधारित नव्या अभ्यासक्रमांमुळं विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शाखेला पसंती दिली असल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्र राज्य सीईटी सेलनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी नोंदणीमध्ये वाढ झाली आहे.

इंजिनिअरिंगसाठी नोंदणी वाढली

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स अशा अभ्यासक्रमांसाठी नोंदणी वाढली असली तरी पारंपारिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचे कल कमी दिसत आहे. 2020 मध्ये 96337 विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. तर, यंदा 1 लाख 10 हजारांच्या जवळपास विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी नोंदणी केलेल्या 96337 विद्यार्थ्यांपैकी 68451 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सूचनेनुसार संगणकाशी संबंधित काही नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेले आहेत. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षीच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता आयटी क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी पंसती दिली होती. नव्यानं सुरु करण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डाटा सायन्स या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती वाढत आहे. त्या तुलनेत विद्यार्थ्यांचा पारंपारिक अभ्यासक्रम मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सीव्हील अभ्यासक्रमांकडे कल कमी आहे.

नव्या अभ्यासक्रमांसाठी परवानगी

विद्यार्थ्यांची संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमांना वाढती पसंती पाहता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्यावतीनं महाविद्यालयांना नवे अभ्यासक्रम सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यासक्रम सुरु करणाऱ्या महाविद्यालयात प्रवेशाची संख्या अधिक होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, इंटरनेट, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे अभ्यासक्रम विविध महाविद्यालयांनी सुरु केले होते. संगणक आणि इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये होत असलेले बदल लक्षात घेता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, इंटरनेट, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन तंत्रज्ञान  या अभ्यासक्रमांचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होत असल्यानं विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडं कल वाढत असल्याचं या क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे.

इतर बातम्या:

राज्यातील शाळांमध्ये ‘माझे संविधान माझा अभिमान उपक्रम सुरु’, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

Maha TET: अखेर महा टीईटी परीक्षा झाली, आता उत्तरतालिकेकडे विद्यार्थ्यांचं लक्ष