
केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला स्वबळावर बहुमत मिळत नसल्याचे पाहून आता विरोधी पक्षाचे नेतेही सक्रिय झाले आहे. सरकार स्थापनेसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पक्षातील मोठे नेते शरद पवार यांनी दोन मोठ्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. शरद पवार यांनी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दल (बीजेडी) प्रमुख नवीन पटनायक यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या असून दोन्ही ठिकाणी जनतेने सरकार बदलाच्या बाजूने कौल दिला आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना मोठा झटका बसला आहे, त्यांचा YSRCP पक्ष आंध्र प्रदेशातून सत्तेबाहेर गेला आहे. तर बीजेडी देखील ओडिशात सत्तेबाहेर आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंचा पक्ष टीडीपी सरकार स्थापन करत आहे, तर ओडिशात भाजपने बीजेडीकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. पत्रकार परिषदेत मात्र आपण कोणाशीही बोललो नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
टीडीपीने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सोबत निवडणुका लढवल्या आहेत. तर बीजेडीने नेहमीच संसदेत एनडीएच्या नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. टीडीपी सत्तेवर येत आहे मात्र दुसरीकडे बीजेडीकडून सत्तेतून बाहेर जात आहे. टीडीपीने लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली आहे. आंध्र प्रदेशात त्यांना 16 जागा मिळाल्या आहेत तर त्याचा मित्रपक्ष भाजपला चार जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत बीजेडीला मात्र जोरदार झटका बसलाय. त्यांना फक्त एका जागेवर आघाडी मिळाली आहे.
बिहारमध्येही राजकीय पेच वाढला आहे. नितीश कुमार यांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. नितीश कुमार हे आधी इंडिया आघाडीचे भाग होते. पण निवडणुकीच्या आधी ते एनडीए सोबत आले. नितीश कुमार हे कधी कोणत्या पक्षासोबत जातील हे सांगता येत नाही. नितीशकुमार यांना सोबत आणण्यासाठी शरद पवारांनी त्यांना फोन केल्याची माहिती आहे. नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू देखील एनडीएचा एक भाग आहे. बिहारमध्ये जेडीयूला स्वबळावर 14 जागा मिळाल्या आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा TDP आणि नितीश कुमार यांचा JDU यांना एकत्र केले तर 16 + 14 म्हणजे 30 जागा होत आहेत. इंडिया आघाडीकडे या तीस जागा आल्यातर ते बहुमताजवळ पोहोचू शकतात.
सध्या भाजपला 240 जागा तर काँग्रेसला 100च्या जवळपासृ जागा मिळताना दिसत आहेत. एनडीएला सुमारे 300 जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला सुमारे 230 जागा मिळू शकतात. पण जर यात टीडीपी आणि जेडीयू यांच्या एकूण तीस जागा मिळाल्या तर हा आकडा २६० होऊ शकतो. त्यांना आणखी १२ जागांची गरज आहे.