
बॉलिवूडमध्ये सगळेच आपलं नशीब आजमवण्यासाठी येत असतात. त्यातले काहीजण यशस्वी होतात तर काहीजणांचा स्ट्रगल सुरुच राहतो तर काहीजण निराशेनं परत जातात आणि वेगळ्याच कोणत्यातरी क्षेत्रात आपलं करिअर करतात. पण काही कलाकार असे असतात ज्यांनी बऱ्यापैकी इंडस्ट्रित काम करूनही त्यांना यश मिळत नाहीत. असाच एक अभिनेता आहे ज्याने बऱ्याच चांगल्या चित्रपटांमधून काम केलं आहे. मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे पण आज त्याच्यावर चक्क रस्त्यावर मोमो विकण्याची वेळ आली आहे.
या अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘foodiedoonie’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही तुफान प्रतिसाद देत अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.
12th Fail अभिनेत्यावर मोमो विकण्याची वेळ
चित्रपटांमध्ये किंवा मालिकेमध्ये एंट्री मिळाल्यानंतरही कलाकार काम मिळवण्यासाठी धडपडत असतात. अनेक वेळा विचारणा करूनही काम मिळत नाही. असंच काहीसं घडलं या अभिनेत्याने मोठ्या बॅनरच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करूनही या अभिनेत्याला आता रस्त्याच्या कडेला मोमो विकावे लागत आहेत. 2023 च्या शेवटी रिलीज झालेल्या विधू विनोद चोप्राच्या ‘१२वी फेल'(12th Fail) या चित्रपटात या अभिनेत्याला पाहिलं असेल. विक्रांत मेस्सीसोबत एका दृश्यात त्यांचाही छोटासा रोल होता. लायब्ररीच्या आत शूट केलेल्या या दृश्यात ते लायब्ररीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत होते. भूपेंद्र तनेजा असं या कलाकाराचं नाव असून छोट्याशा भूमिकेतही त्यांनी मनापासून आपला अभिनय दाखवला होता.
भूपेंद्र तनेजा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे
एवढेच नाही तर भूपेंद्र तनेजा यांनी अनेक चित्रपट केले आहेत. भूपेंद्र तनेजा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय विश्वात सक्रिय आहेत. त्यांनी आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातही काम केलं आहे. याशिवाय ते विवेक रंजन अग्निहोत्रीचा सुपरहिट चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’मध्येही दिसले होते. तसेच त्यांनी शाहिद कपूरच्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटातही काम केलं आहे. ‘गन्स अँड रोजेस’ या वेब सीरिजमध्येही ते दिसले होते. 2012 मध्ये ‘रंगरूट’मध्येही त्यांनी उत्तम काम केलं आहे. त्यांनी ज्या ज्या चित्रपटात काम केलं आहे त्या चित्रपटांमधील त्यांची भूमिका भलेही छोटी असो पण ती लक्षात राहिल अशीच केली.
भूपेंद्र तनेजा यांच्यावर मोमो विकण्याची वेळ का आली?
पण आता एवढं काम करूनही शेवटी भूपेंद्र तनेजा यांच्यावर मोमो विकण्याची वेळ आली आहे. त्यांनी आपल्या मोमोज स्टॉलचे नावही ’12 वी फेल’ असं ठेवलं आहे. ते स्वत: खाद्यपदार्थ बनवतात आणि तिथे येणाऱ्या ग्राहकांना देतात. यामध्ये त्यांची पत्नी त्यांना मदत करते. त्यांनी हा बिझनेस त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सुरू केला असून कामाची कमतरता आणि साईड ॲक्टर्सना दिले जाणारे कमी मानधन यामुळे त्यांना हे काम कराव लागत आहे.पण हे काम किंवा हा व्यवसाय देखील ते तेवढ्याच मनापासून आणि आवडीने करतात. तसेच हे काम करतानाही त्यांना कोणताही संकोच वाटत नाही. तसेच ते त्यांचा अभिनयही सुरुच ठेवणार आहेत.