
Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी प्रदर्शित होताच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आजही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान राखून ठेवलं आहे.
ज्येष्ठ फिल्म निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांचा सुपरहिट हिंदी चित्रपट ‘राम लखन’ प्रदर्शित होऊन तब्बल 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. 27 जानेवारी 1989 रोजी प्रदर्शित झालेली हा क्लासिक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान राखून आहे. चित्रपटातील जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि हा चित्रपट बॉलिवूडच्या इतिहासात अजरामर ठरला.
एका मुलाखतीत सुभाष घई यांनी ‘राम लखन’च्या निर्मितीबाबत एक रंजक किस्सा सांगितला होता. एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी ते बराच वेळ घेतात, मात्र ‘राम लखन’च्या बाबतीत अपवाद घडला. त्यांनी या चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट अवघ्या 15 दिवसांमध्ये लिहिली. हे काम त्यांनी खंडाळा येथे मुक्काम करून पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
सुभाष घई यांनी स्पष्ट केले की, चित्रपटाचे शूटिंग लवकर सुरू करायचे असल्यामुळे त्यांनी स्क्रिप्ट लिहितानाच उपलब्ध असलेल्या कलाकारांना लक्षात ठेवले होते. स्टार्सच्या मागे न लागता, जे कलाकार तात्काळ काम सुरू करू शकतील अशांनाच त्यांनी पसंती दिली होती.
कमाई पाहून अनेकजण थक्क
‘राम लखन’ हा एक कौटुंबिक सूडनाट्य चित्रपट आहे. या चित्रपटात राम आणि लखन या दोन भावांची कथा मांडण्यात आली आहे. राम (जॅकी श्रॉफ) हा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बनतो तर लखन (अनिल कपूर) हा खट्याळ, बेफिकीर आणि मोकळ्या स्वभावाचा तरुण आहे. दोघांच्या वडिलांची हत्या त्यांचे काका विश्वंभर (अमरीश पुरी) करतात. त्यांची आई शारदा (राखी) आपल्या मुलांना अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची आणि वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची प्रेरणा देते. या चित्रपटात चांगुलपणा विरुद्ध वाईटपणा, भाऊबंदकी आणि न्याय यांसारख्या विषयांना प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘राम लखन’ हा 1989 सालातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि 35 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला 9 नामांकन मिळाली. 3 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाने 18 कोटींची कमाई केली होती.