54 वर्षांपूर्वीच्या गाण्याने पुन्हा इतिहास घडवला, आजही हे गाणं ऐकू येताच दिवसभर गुणगुणतात लोक
54 वर्षांपूर्वींचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्याचा 2002 मध्ये बनला असा रीमिक्स की ऐकून प्रत्येक चाहता आजही धरतो ठेका. गेल्या अनेक दिवसांपासून गाणं आहे सुपरहिट.

1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘समाधी’ या चित्रपटातील ‘कांटा लगा… बंगल के पीछे’ हे गाणं आजही अनेकांच्या आठवणीत आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील या गाण्याला आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले होते तर गीतकार मजरूह सुल्तानपुरी होते. आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेले हे गाणं त्या काळात चांगलेच लोकप्रिय झाले होते. विशेष म्हणजे तब्बल तीन दशकांनंतर 2002 मध्ये याच गाण्याचा रिमिक्स नव्या अंदाजात आला आणि शेफाली जरीवाला रातोरात ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली.
‘कांटा लगा’ हे गाणं 1972 मध्ये आलेल्या ‘समाधी’ चित्रपटाचा भाग होते. प्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटात धर्मेंद्र यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. आशा पारेख आणि जया भादुडी त्यांच्या प्रेमिकांच्या भूमिकेत दिसल्या होत्या.
चित्रपटाची कथा काय?
चित्रपटाची कथा डाकू लाखन सिंहभोवती फिरते. गुन्हेगारीचे जग सोडून पत्नी चंपासोबत नव्याने आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखन सिंहला परिस्थिती पुन्हा त्याच मार्गावर घेऊन जाते. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी आर. डी. बर्मन यांच्यावर होती. ‘कांटा लगा’सह चित्रपटातील इतरही काही गाणी लोकप्रिय झाली होती.
‘समाधी’ केवळ गाण्यांमुळेच चर्चेत राहिला नाही तर बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. ट्रेड आकडेवारीनुसार, भारतात चित्रपटाने सुमारे 1.60 कोटी रुपयांची कमाई केली आणि त्याला ‘सेमी-हिट’ म्हणून संबोधले गेले. काही जुन्या ट्रेड आकडेवारीत मात्र चित्रपटाची कमाई सुमारे 3.20 कोटी रुपये असल्याचे नमूद आहे.
2002 मध्ये रिमिक्स आणि शेफाली जरीवाला ठरली ‘कांटा लगा गर्ल’
2002 मध्ये या जुन्या गाण्याला नव्या पिढीला आकर्षित करणाऱ्या अंदाजात सादर करण्यात आले. टी-सीरीजच्या ‘DJ Doll’ प्रोजेक्टअंतर्गत ‘कांटा लगा’चा रिमिक्स व्हिडिओ तयार करण्यात आला. राधिका राव आणि विनय सप्रू यांनी या व्हिडिओचे दिग्दर्शन केले होते.
त्यावेळी शेफाली जरीवाला अवघी 19 वर्षांची इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी होती. राधिका राव आणि विनय सप्रू यांनी तिला मुंबईतील लिंकिंग रोडवर पाहिले होते. त्यानंतर ऑडिशन घेऊन तिची या व्हिडिओसाठी निवड करण्यात आली.
व्हिडिओ प्रदर्शित होताच शेफाली जरीवालाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. ती ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. विशेष म्हणजे सोशल मीडियाचा जमाना सुरू होण्यापूर्वीही हा रिमिक्स व्हिडिओ देशभरात प्रचंड लोकप्रिय झाला आणि 2000च्या दशकातील सर्वाधिक चर्चिलेल्या रिमिक्स गाण्यांपैकी एक ठरला.