Sayaji Shinde: 100 वर्षांपूर्वींच्या वडाच्या झाडाला जीवदान; सयाजी शिंदेंच्या प्रयत्नांनंतर डेरेदार वृक्षाचं पुनर्रोपण

| Updated on: Jul 17, 2022 | 11:12 AM

पावसाळ्यात वादळीवाऱ्याने, पावसाच्या जोरदार माऱ्याने अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडतात. उन्मळून पडणाऱ्या या झाडाचं अनेकदा पुनर्रोपण करणं शक्य असतं.

Sayaji Shinde: 100 वर्षांपूर्वींच्या वडाच्या झाडाला जीवदान; सयाजी शिंदेंच्या प्रयत्नांनंतर डेरेदार वृक्षाचं पुनर्रोपण
सयाजी शिंदेंच्या प्रयत्नांनंतर डेरेदार वृक्षाचं पुनर्रोपण
Image Credit source: Instagram
Follow us on

अवघ्या काही दिवसांपूर्वीच उन्मळून पडणाऱ्या झाडाचं (Tree) पुनर्रोपण करणं शक्य असतानाही अशा झाडावर कुऱ्हाड चालवल्याने अभिनेता संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर आता अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी कळंबा इथल्या वडाच्या झाडाला जीवदान दिलंय. कळंबा तलाव परिसरातील 100 वर्षांपूर्वींचं वडाचं झाड मुसळधार पाऊस, वादळ आणि वाऱ्याने उन्मळून पडलं होतं. नैसर्गिक प्रक्रिया करून अखेर त्या झाडाचं पुनर्रोपण करण्यात आलं. सयाजी देवराई फाऊंडेशन आणि संजय घोडावत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. जेसीबी यंत्र, दहा कर्मचारी आणि आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या वडाच्या डेरेदार वृक्षाचं पुनर्रोपण करण्यात आलं. झाडाची पुन्हा जोमाने वाढ व्हावी यासाठी त्याच्या बुंध्यावरती निसर्ग तज्ज्ञ सुहास वायंगणकर यांनी नैसर्गिक परिक्रिया केली.

झाडांचा बळी घेणाऱ्या ‘चेन सॉ कटर’ यंत्रावर बंदी घालण्याची मागणी

यावेळी बोलताना वृक्षसंवर्धनाचं महत्त्व पटवून देताना झाडांचा बळी घेणाऱ्या ‘चेन सॉ कटर’ यंत्रावर बंदी घालण्याची मागणी सयाजी शिंदे यांनी केली. “झाडं ऑक्सिजन देतात. त्यामुळे प्रत्येकाने संवेदनशीलतेने त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाने सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरज आहे”, असंही ते म्हणाले.

पावसाळ्यात वादळीवाऱ्याने, पावसाच्या जोरदार माऱ्याने अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडतात. उन्मळून पडणाऱ्या या झाडाचं अनेकदा पुनर्रोपण करणं शक्य असतं. पावसाळा सुरु झाल्यापासून गेल्या महिनाभरात जवळपास 100 हून अधिक झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. परंतु त्याची दखल पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून घेतली जात नाही, याकडे संतोष जुवेकरनेही लक्ष वेधलं होतं. “आपल्या घरात कुणी आजारी पडलं किंवा अपघातात लुळंपांगळं झालं तर आपण त्याला घराबाहेर काढतो का? त्याची काळजी घेऊन बरं करतो ना? तशीच निसर्गाची काळजी घ्या, तरंच निसर्ग आपली काळजी करेल. आपल्या घराजवळ कुठेही झाड उन्मळून पडलं असेल आणि त्याचं पुनर्रोपण शक्य असेल तर ते जरुर करा,” असंही आवाहन त्याने चाहत्यांना केलं होतं.

हे सुद्धा वाचा