‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा महारविवार; महाकाली रुपात अवतरणार देवी

मालिकेचा महारविवार विशेष भाग 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होईल. या महारविवार एपिसोडमध्ये प्रेक्षकांना महाकाली देवीचा अवतार पहायला मिळेल.

आई तुळजाभवानी मालिकेचा महारविवार; महाकाली रुपात अवतरणार देवी
Mahakali
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 20, 2025 | 12:16 PM

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत देवींसाठी पृथ्वीवर येऊन भवानीशंकर रूपात राहिलेले महादेव आणि आपल्या आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी धडपडणारे बालगणेश आणि अशोकसुंदरी हा गोष्टीचा टप्पा अंतिम चरणात आहे. हा टप्पा कसा उलगडणार, देवींना महादेवांचे सत्य कसे कळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. भवानी शंकरच महादेव आहेत हे कळल्यावर मालिकेच्या कथानकात कुठलं वळण येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बालगणेश आणि अशोकसुंदरीने देवींसाठी तुळजापुरात वाड्याची निर्मिती करण्याची विनंती करण्यामागची प्रेरणा आईवडिलांना एकत्र आणावी हीच होती. या वाड्याची निर्मिती त्यापाठोपाठ कल्लोळ तीर्थ, गायमुख तीर्थ यांच्या निर्मिती मागची गोष्ट प्रेक्षकासमोर उलगडत असतानाच देवीला भवानीशंकर यांच्या रूपाबद्दल येणारी शंका आणि अखेर महादेवांचे खरे रूप नाट्यमयरित्या उघड होणे हा अत्यंत रोमहर्षक कथाभाग पुढील भागात उलगडणार आहेत.

गुरुवार 20 फेब्रुवारी ते शनिवार 22 फेब्रुवारीच्या भागांमध्ये दररोज रात्री नऊ वाजता ही कथा उलगडणार आहे. याचा कळससाध्य येत्या रविवारी 23 फेब्रुवारीच्या महाएपिसोडमध्ये होणार आहे. महादेव आणि संपूर्ण कुटुंबाने सत्य लपवल्याने व्यथित झालेल्या देवीच्या रागात महिषासुराने केलेल्या आगळीकीने भर पडणार आहे. यामुळे आई तुळजाभवानीचे आजवर कधीही न पाहिलेले न भूतो न भविष्यति महाकाली रूप प्रेक्षकांना दिसणार आहे. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा महारविवार विशेष भाग येत्या 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पहायला मिळेल.

याबाबत बोलताना पूजा काळे म्हणाली, “मालिकेमध्ये एक नवं वळण येणार आहे. प्रेक्षकांना आई तुळजाभवानीचे महाकाली रूप पाहायला मिळणार आहे. हे रूप हुबेहूब साकारण्यासाठी म्हणजेच मेकअप, आभूषणे, पेहराव हे सगळे मिळून मला तीन ते चार तासांचा कालावधी लागला. वेगवेगळ्या प्रकारचे हार, मुकुट घालून पाहिले. कारण आम्हाला कुठल्याही प्रकारची कसर सोडायची नव्हती. माझी अशी नाही पण संपूर्ण टीमची यामागे अफाट मेहनत होती. मी पहिल्यांदाच असं रूप धारण करत होते त्यामुळे दडपण होतंच. पण मला ऊर्जा मिळत गेली आणि मी तसं काम करत गेली. मला आशा आहे की प्रेक्षकांनादेखील ते आवडेल.”

महिषासुराची ही आगळिक कोणती? देवीला व्यथित करणारे भवानीशंकरांचे सत्य कोणते? आई तुळजाभवानीचे महाकाली रुपाचे प्रयोजन काय या सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना ‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या महारविवारच्या भागात पहायला मिळेल.