मराठी मातीत कमवून माज… रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्ती… अंशुमन विचारे स्पष्टच म्हणाला
महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे... रिक्षाचालकांवर मराठी भाषेची सक्ती... अंशुमन विचारे थेट म्हणाला, 'मराठी मातीत कमवून माज...', अभिनेत्याच्या पोस्टची सर्वत्र चर्चा....

“परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकणे व बोलणे अनिवार्य” हा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्यात अनेक परप्रांतीय रिक्षा चालक आहेत, ज्यांना मराठी येत नाही… अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून मराठी भाषा येणं अनिवार्य असल्याची घोषणा केली. यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे… प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनंतर रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी देखील 4 मे पासून राज्याव्यारी आंदोलनाची घोषणा केली आहे… मराठी सक्तीच्या विरोधात 4 मे पासून 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार आहेत. नवीन नियमानुसार, ज्या चालकांना मराठी भाषा येत नाही, त्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात… नव्या निर्णयामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये संतापचं वातावरण असताना अनेक मराठी सेलिब्रिटींनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
मराठी अभिनेता अंशुमन विचारे याने देखील इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चांगलचं खडसावलं आहे… अंशुमन इन्स्टाग्रामवर व्यक्त होत म्हणाला, ‘मराठी मातीत कमवून माज करायचा नाही… मराठी सगळ्यात आधी…’, असं अभिनेत्याने स्पष्ट लिहिलं आहे…
फक्त अंशुमन यानेच नाही तर, प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत ठोमे यांने देखील मराठी सक्ती… या निर्णयाचं स्वागत केलं आहे, ’15 लाख आहेत म्हणजे.. मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं.. जिथे जमणार आहात तिथून तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा. तिथे कमवा आणि खा. महाराष्ट्रात मराठी बोला. शिका, प्रयत्न करा…’
अभिनेता रितेश देशमुखनेही भाषा सक्तीचं समर्थन केलं आहे. “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्यच असली पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो, तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी जो काही हा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे”. असं मत रितेश देशमुख याने मांडलं आहे.
तर प्रताप सरनाईक यांच्या निर्णयानंतर रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. कारण मराठी भाषा येत नसल्यास त्यांचा थेट परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील सुमारे 75 टक्के चालक हे हिंदी भाषिक आहेत. अशात हा निर्णय लाखो लोकांच्या पोटापाण्यासाठी धोका निर्माण करणारा आहे… असा दावा संघटनेने केला आहे. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर, रिक्षा आणि टॅक्सी चालक राज्यव्यापी आंदोलन छेडतील…. असा इशारा रिक्षा चालक आणि मालक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक शरद राव यांनी दिला आहे.