
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांचा जीव घेतला होता. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे . भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत केवळ पाकिस्तानच नाही तर तिथे राहणारे कलाकारही अस्वस्थ आहेत. फवाद खान पासून ते पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानपर्यंत सर्वांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरला ‘कायर’ म्हणजेच ‘भ्याड हल्ले’ म्हटलं आहे. त्यानंतर जगभरातून या पाकिस्तानी कलाकरांवर टीका होताना दिसत आहे.
माहिरा खानवर भडकला अभिनेता
फवाद खानवर तर अख्खं सोशल मीडियाच तुटून पडलं आहे. आपल्या बऱ्याच भारतीय कलाकारांनीही त्याला सुनावलं आहे. आता माहिरा खानवरही भारतीय कलाकार टीका करताना दिसत आहे. नुकतीच एका अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत आहे. या अभिनेत्याने माहिराच्या पोस्टवर उत्तर देत तिने पुन्हा भारतात काम मागायला येऊ नये असं म्हटलं आहे. टीव्ही अभिनेता तथा बिग बॉस फेम अविनाश मिश्रा यांने माहिराच्या पोस्टवर चोख प्रत्युत्तर देत तिला फटकारलं आहे.
‘ऑपरेशन सिंदूरला ‘भ्याड’ म्हटलं
माहिरा खानने तिच्या इंस्टाग्रामवर ऑपरेशन सिंदूरला ‘भ्याड’ म्हटलं आहे. तिने लिहिलं होतं की, “भारत, तुमचे युद्ध आणि द्वेषपूर्ण भाषण वर्षानुवर्षे सुरू आहे… तुम्ही मध्यरात्री शहरांवर हल्ला करता आणि त्याला विजय म्हणता?’ लाज वाटली पाहिजे” अशी पोस्ट करताच भारतीयांनी विविध माध्यमातून तिला चांगलंच फटकारलं आहे.
“आता काम मागायला येऊ नकोस…”
माहिरा खानची ही पोस्ट पाहिल्यानंतर अविनाश मिश्राचा राग अनावर झाला. अविनाशने तिच्या पोस्टवर उत्तर देत लिहिलं आहे की, ‘अरे माहिरा दीदी, आम्हाला पाकिस्तानला दोष देण्याची हौस नाहीये. संपूर्ण जगाने पुरावे पाहिले आहेत. आता परिस्थिती सुधारल्यानंतर, काम मागण्यासाठी आमच्या भारतात येऊ नका.”
अभिनेत्याच्या दोन्ही पोस्ट व्हायरल
अविनाशने त्याच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे “सीमेपलीकडील सेलिब्रिटी – ज्यांनी भारतीय प्रेक्षकांच्या बळावर आपली ओळख निर्माण केली आहे, ते आता भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या कारवाईला ‘लज्जास्पद’ आणि ‘कायर’ म्हणत आहेत, हे ढोंग आहे” असं म्हणत त्याने तिला चांगलंच फटकारलं आहे.
“आमचे सेलिब्रिटी आता कुठे आहेत?”
एवढंच नाही तर, त्याने काही भारतीय कलाकारांना त्यांच्या देशासाठी उभे न राहिल्याबद्दल आणि ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ न बोलल्याबद्दलही लक्ष्य केले. अविनाशने लिहिले आहे की ‘ आमचे सेलिब्रिटी आता कुठे आहेत? जर तुम्ही फक्त तुमचा ‘ब्रँड’ किंवा फॉलोअर्सची संख्या वाचवण्यासाठी तुमच्या देशासाठी बोलू शकत नसाल, तर कधीही भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा आव आणू नका. मौन योग्य नाही. हे भ्याडपणा आहे.” असं म्हणत त्याने सर्व कलाकारांनी ऑपरेशन सिंदूरला किंवा भारतीय सैन्याला पाठिंब देण्याचं आवाहन केलं आहे.