अभिनेते महेश आनंद यांचा राहत्या घरी मृतदेह आढळला!

अभिनेते महेश आनंद यांचा राहत्या घरी मृतदेह आढळला!

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि निर्माते महेश आनंद यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. ते 57 वर्षांचे होते. मुंबईतील वर्सोवा येथे महेश आनंद राहत होते. तेथील घरीच त्यांचा मृतदेह आढळला. महेश आनंद यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून, उद्या पोस्टमार्टम केले जाणार आहे. त्यानंतरच महेश आनंद यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल.

अभिनेते महेश आनंद यांच्या मृत्यूची माहिती मिळताच, हिंदी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात आली. 80 आणि 90 च्या दशकात महेश आनंद यांनी खलनायकाच्या अनेक भूमिका लोकप्रिय केल्या. मजबूर, स्वर्ग, विश्वात्मा, गुमराह, खुद्दार यांसारखे अनेक सिनेमांमध्ये महेश आनंद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नुकतेच अभिनेते गोविंदा यांच्या ‘रंगीला राजा’ सिनेमातून कमबॅकही केले होते.

अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, सनी देओल, गोविंदा, संजय दत्त यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत महेश आनंद यांनी सिनेमांमध्ये काम केले आहे.

महेश आनंद हे वर्सोव्यातील घरी एकटेच राहत होते. त्यांची पत्नी 2002 पासून वेगळी राहत होती. त्यामुळे महेश आनंद यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या पत्नीलाही नव्हती. महेश आनंद हे आर्थिक अडचणीत होते, अशीही माहिती निकटवर्तीयांनी सांगितली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI