
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याचा’ मन्नत’ बंगला अतिशय फेमस आहे. त्याच्या याच बंगल्याबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे. अभिनेता शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून 9 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. हे प्रकरण महाराष्ट्र सरकार आणि शाहरुखच्या मन्नत बंगल्याशी निगडीत आहे. 9 कोटी रुपये परत करण्यासंदर्भात शाहरूखची पत्नी गौरी खान याने याचिका दाखल केली होती. तीच याचिका महाराष्ट्र सरकार मंजूर करू शकतं. शाहरुख खानचं घर मन्नत उभारलं आहे, त्या जमिनीवर अतिरिक्त पैसे देण्यात आल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे.
सरकारने दिली मंजुरी
वांद्रे पश्चिम येथे अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांच्या दोघांच्या नावे असलेला हा अतिशय विशाल बंगला, खरंतर राज्य सरकारने पूर्वीच्या मालकाला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीवर बांधण्यात आले आहे. अभिनेता आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या घर ‘मन्नत’साठी अतिरिक्त मोबदला म्हणून मागितलेले पैसे परत केल्यानंतर सरकारने या कराराला मंजुरी दिली. त्यानंतर मालकाने शाहरुख खानला मालमत्ता विकली
2,446 चौरस मीटरमध्ये पसरलेली ही मालमत्ता शाहरुख आणि गौरी खानच्या नावावर नोंदणीकृत कराराद्वारे हस्तांतरित करण्यात आली होती. यापूर्वी, महाराष्ट्र सरकारने, मूळ शीर्षक धारक असल्याने, अनर्जित उत्पन्नाचा हिस्सा आकारला होता, ज्याची गणना बाजार मूल्य आणि रेडी रेकनर मूल्य (RRR) मधील फरकाच्या आधारे केली जाते. गौरी आणि शाहरुखने मार्च 2019 मध्ये रेडी रेकनर किमतीच्या 25 टक्के रक्कम भरली होती, जी 27.50 कोटी रुपये होती. मात्र राज्य सरकारने कन्व्हर्जन फी मोजताना अनावधानाने चूक केल्याचे नंतर शाहरूख-गौरीच्या लक्षात आले. कन्व्हर्जन फी मोजण्यात आली तेव्हा त्या जमिनीच्या तुकड्यापेक्षा बंगल्याची किंमत गृहीत धरण्यात आली होती.
मात्र सप्टेंबर 2022 मध्ये ही चूक लक्षात आल्यानंतर शाहरूखची पत्नी गौरी खान यांनी जिल्हाधिकारी एमएसडी यांना पत्र लिहीलं. अतिरिक्त पेमेंट परत करण्याची मागणी त्या पत्रात करण्यात आली, ती किंमत 9 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे . आता हेच पैसे शाहरुख -गौरीला परत मिळू शकतात.