
तमिळनाडूच्या करूर येथे शनिवारी, 27 सप्टेंबर रोजी झालेल्या एका दु:खद अपघाताने पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. चित्रपटसृष्टीतून राजकारणात प्रवेश करणारा तमिळगा वेट्ट्री कझगम (TVK)चा प्रमुख आणि सुपरस्टार विजय यांच्या मेगा रॅलीत चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढून 39 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये 10 मुले आणि 12 महिलांचा समावेश आहे. TVKचे प्रमुख विजय मंचावरून भाषण करत असताना हा अपघात झाला. परिस्थिती बिघडताच विजय यांनी भाषण थांबवले आणि लोकांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर ते भाषण अर्धवट सोडून निघून गेले.

विजय यांनी अलीकडेच एच. विनोद यांच्या दिग्दर्शनाखालील ‘जननायकन’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. दरम्यान, विजय यांनी तमिळगा वेट्ट्री कझगम म्हणजेच TVK ची स्थापना केली आहे आणि 2026 च्या निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक शनिवारी सक्रिय दौरा करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या आठवड्यात तिरुची आणि अरियालूर, दुसऱ्या आठवड्यात तिरुवरूर आणि नागपट्टिनम येथे प्रचार केला. तिसऱ्या शनिवारी विजय नामक्कल आणि करूर भागात प्रचारासाठी गेले होते, जिथे हा दु:खद अपघात घडला.

या प्रचारासाठी विजय चेन्नईहून प्रायव्हेट जेटने प्रवास करत आहेत. ते प्रचारासाठी जाताना प्रायव्हेट जेटचा वापर करताना दिसत आहेत. केवळ प्रचारासाठीच नव्हे, तर गेल्या 1 मे रोजी कोडैकनाल येथे चित्रपटाच्या शूटिंगसाठीही विजय प्रायव्हेट जेटने गेले होते.

VT-PCR - Gulfstream G200 मॉडेलच्या प्रायव्हेट जेटमधून विजय गेल्या दोन आठवड्यांपासून प्रवास करत आहेत. विजय वापरत असलेल्या प्रायव्हेट जेटची किंमत अंदाजे 8 कोटी रुपये आहे.

तुम्हाला माहित आहे का, या विमानाचा एका दिवसाचा भाड्याचा खर्च किती आहे? एका अहवालानुसार, विजय वापरत असलेल्या प्रायव्हेट जेटचा एका दिवसाचा भाड्याचा खर्च सुमारे 14 लाख रुपये आहे. हे विमान कोणाचे आहे, हे समोर आलेले नाही. असे म्हटले जात आहे की, हे विमान हैदराबाद बेस्ड आहे आणि प्रत्येक प्रचार मोहिमेपूर्वी हैदराबादहून चेन्नईला येते,

विजय यांनी अलीकडेच चेन्नई ते त्रिची हे अंतर अवघ्या 38 मिनिटांत पूर्ण केले. ही माहितीही या वेबसाइटवर देण्यात आली आहे. यापूर्वी ते याच विमानाने कोडाइकनाल येथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले होते.