
Sunjay Kapur Death : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती आणि उद्योगपती संजय कपूर याचे वयाच्या 53 व्या वर्षी काल लंडनमध्ये निधन झाले. पोलो सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने संजय कपूरने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. दिवंगत संजय कपूरच्या अनेक मित्रांनी सोशल मीडियावर त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
प्रसिद्ध अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी संजय कपूर याच्या निधनाची पुष्टी केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या X (पूर्वीचे ट्विटर) वर भावनिक पोस्ट करून त्यांनी दुःख व्यक्त केले. “संजय कपूर याच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले: आज सकाळी इंग्लंडमध्ये त्याचे निधन झाले, हे खूप मोठे नुकसान आहे. त्याच्या कुटुंबियांना आणि सोनकॉमस्टारमधील सहकाऱ्यांना माझी मनापासून संवेदना.. ओम शांती.” असे त्यांनी पोस्टमध्ये लिहीलं.
कशामुळे झाला मृत्यू ?
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, संजयच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, संजय कपूर गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना अचानक त्याला गुदमरल्यासारखे वाटले. त्याने खेळ थांबवण्याची विनंती केली आणि नंतर तो मैदानाबाहेर गेला. रिपोर्टनुसार, संजय कपूरने मधमाशी गिळली होती आणि त्याच्या घशात दंश झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आला.
कोण होता संजय कपूर ?
संजय कपूर हा नामवंत उद्योगपती होता. तो सोना कॉमस्टारचा चेअरमन होता आणि भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या लीडर्समध्ये त्याची गणती व्हायची. त्याला पोलो खेळण्याची खूप आवड होती, तसेच तो सोना पोलो संघाचा मालक होता आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत त्याने या खेळात सक्रिय सहभाग घेतला.
करिश्मा-संजयचा घटस्फोट का झाला ?
बॉलिवूडची नामवंत अभिनेत्री असलेली करिश्मा कपूर आणि संजय कपूर या दोघांचे 2003 साली लग्न झालं होतं, परंतु त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक वर्षे अडचणी आल्या आणि अखेर 2014 साली करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज केला. 2016 साली ते कायदेशीररित्या विभक्त झाले. त्या दोघांना मुलगी समायरा आणि मुलगा कियान अशी दोन अपत्य आहेत.
रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरने तिची आई बबिता कपूरच्या सांगण्यावरून संजय कपूरशी लग्न केले, मात्र तिचे वडील रणधीर कपूर या लग्नाच्या बाजूने नव्हते. कालांतराने त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागल्या आणि वादग्रस्त कायदेशीर लढाईनंतर अखेर दोघे वेगळे झाले. घटस्फोटाच्या खटल्यादरम्यान दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. अखेर त्यांच्या मुलांचा ताबा करिश्माकडे देण्यात आला.
संजयने केलं तिसरं लग्न
करिश्मा कपूरशीघटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी संजय कपूरने मॉडेल आणि उद्योजिका प्रिया सचदेवशी लग्न केले. या जोडप्याला एक मुलगा आहे ज्याचे नाव त्यांनी अजरियास कपूर ठेवले. दरम्यान, करिश्माने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आणि संजयपासून वेगळे झाल्यानंतर तिने अद्याप पुन्हा लग्न केलेलं नाही.