भरत दाभोळकरांनी चालवली रिक्षा; नेमकं कारण काय?

नाटकाच्या नावात बदल झाल्याची घोषणा करण्यासाठी भरत दाभोळकर यांनी स्वत: रिक्षा चालवली आणि त्या रिक्षेवर नाटकाचं पोस्टर लावून विलेपार्ल्यामध्ये ही रिक्षा फिरवली. भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक आगळंवेगळं नाटक घेऊन येत आहेत.

भरत दाभोळकरांनी चालवली रिक्षा; नेमकं कारण काय?
Bharat Dabholkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 28, 2026 | 2:10 PM

प्रसिद्ध अॅड गुरु आणि इंग्रजी, हिंदी, गुजराती रंगभूमीवर नाटकांचे विविध ट्रेंड रुजवणारे भरत दाभोळकर पहिल्यांदाच मराठीमध्ये एक नवं कोरं नाटक रंगभूमीवर दाखल झाले आहेत. या नाटकाचं पूर्वीचं नाव बदलून आता नवीन मराठमोळं नाव आणि वेगळं रूप नाटकाला देण्यात आलं आहे. या बदलाची घोषणा करण्यासाठी भरत दाभोळकरांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या रिक्षेवर त्या नाटकाचं पोस्टर लावून विलेपार्ल्यामध्ये ही रिक्षा फिरवली आणि त्याच रिक्षेने ते विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग करायला दाखलही झाले. दाभोळकर हे आपल्या विविध छंदांसाठीसुद्धा ओळखले जातात. त्यांना गाड्यांचा प्रचंड शौक आहे. त्यांच्याकडे विविध पद्धतीच्या गाड्या असून त्यांच्या मालकीच्या दोन रिक्षासुद्धा आहेत. या रिक्षाचा लायसन्स आणि बिल्लाही त्यांच्याजवळ आहे.

नुकतंच रंगभूमीवर दाखल झालेल्या ‘कॅरी ऑन स्पाईंग’ या दाभोळकरांच्याच इंग्रजी नाटकावर आधारित असलेल्या या मराठी नाटकाचं नाव ‘हेरगिरी चालू आहे’ असं बदलण्यात आलं असून त्यामध्ये मराठी प्रेक्षकांना नवीन अशी खास दाभोळकरी शैली वापरण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवरील काही प्रसिद्ध कलाकार त्यात काम करीत आहेत. नाटकाचे 7 प्रयोगही झाले आहेत. ‘सवाईगंधर्व’ निर्मित आणि ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची निर्मिती तरुण निर्माता आकाश भडसावळे याने केली असून या संस्थांचं हे सातवं नाटक आहे.

भरत दाभोळकरांसारख्या मोठ्या हस्तींना मराठी रंगभूमीवर आणण्याचं आणि एक वेगळ्या प्रकारचं – मराठी प्रेक्षकांना पूर्णतः नवीन असा – ‘ब्लॅक ह्युमर’ असलेलं हे नाटक निर्मित आणण्याचं धाडस आकाशने केलं आहे. त्या निमित्ताने इंग्रजी आणि हिंदी रंगभूमीवर काम करणारे लेखक-दिग्दर्शक भरत दाभोळकर आणि अभिनेते मोहन आझाद यांनी प्रथमच मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. त्यांच्या या वेगळ्या शैलीतील नाटक मराठी रसिकांना एक अनोखी पर्वणी असेल; मात्र हे नाटक तद्दन विनोदी शैलीतील नसून इंग्रजी रंगभूमीवर गाजलेल्या आणि अनेक वेळा आपलं अस्तित्व दाखवून देणाऱ्या दाभोळकरी ह्युमरचं दर्शन या नाटकात घडतं.

देशोदेशीच्या विविध कलांना स्वीकारणारा मराठी प्रेक्षक या एका वेगळ्याच बाजाचंही निश्चिच स्वागतच करेल अशी खात्री या नाटकाच्या टीमला आहे. अर्थात हे वेगळेपण पाहायला नाट्यगृहात एकदा तरी जाऊन हे नाटक पाहायलाच पाहिजे, कारण नाट्यगृहातही ‘हेरगिरी चालू आहे’.

Follow Us