
गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये घराणीशाहीचा मुद्दा विशेष चर्चेत आला. फिल्म इंडस्ट्रीत राजकारण, गटबाजी आणि घराणेशाही या सर्व गोष्टी खूप आधीपासूनच पहायला मिळाल्या आहेत. परंतु आता त्यावर मोकळेपणे बोललं जातंय. अनेक मोठमोठे कलाकारसुद्धा या गोष्टींचा शिकार झाले आहेत. अभिनेता आदित्य पांचोलीसुद्धा ऐशीच्या दशकात या गोष्टींचा शिकार झाला होता. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटासाठी आदित्यची निवड झाली होती. माधुरी दीक्षितसोबत तो मुख्य भूमिका साकारणार होता. परंतु नंतर चित्रपटातील त्याची भूमिका दुसऱ्याला देण्यात आली. बऱ्याच वर्षांनंतर आता आदित्यने या गोष्टीचा खुलासा केला आहे.
आदित्य पांचोलीने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता त्याने नाव न घेतला अनिल कपूरवर निशाणा साधला आहे. आदित्यच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. फिल्म इंडस्ट्रीतील राजकारणामुळे मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं, असा खुलासा आदित्यने केला आहे.
आदित्य पांचोलीने सोशल मीडियावर एक नोट शेअर केली आहे. यामध्ये त्याने ‘तेजाब’ या चित्रपटाबाबत खुलासा केला आहे. त्याने लिहिलं, ‘तेजाबमध्ये (1988) माधुरी दीक्षितसोबत मुख्य भूमिकेसाठी माझी आधी निवड झाली होती. दिग्दर्शक एन. चंद्रा याबाबत आताही सांगू शकतात. दुर्दैवाने एका अभिनेत्याने त्याच्या मोठ्या भावाशी (जो इंडस्ट्रीत आजही सक्रिय आहे) बोलून दिग्दर्शकांची मनधरणी करून माझी भूमिका हिसकावून घेतली. बाकी सगळा तर इतिहास आहे.’
I was the original choice for Tezaab (1988), opposite @MadhuriDixit . Director N. Chandra, still very much around can confirm this.
Unfortunately, an actor, through his elder brother (who remains active in the industry), influenced the director to replace me. The rest, as they… pic.twitter.com/0GsBvsK2KG
— Aditya Pancholi (@AdityaRPancholi) October 27, 2025
आदित्यने या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, ‘नुकतंच मी एका अभिनेत्याला त्याच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान घराणेशाहीबद्दल बोलताना ऐकलं. मी हे स्पष्टपणे म्हणू शकतो की फिल्म इंडस्ट्रीतील राजकारण हे घराणेशाहीपेक्षा जास्त खोलवर रुजलेलं आहे. पक्षपात, सत्तेचे खेळ आणि जोडणं-तोडणं या गोष्टी कौटुंबिक नात्यांपेक्षा जास्त करिअरला प्रभाविक करतात.’
आदित्य पांचोलीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हा निश्चितपणे अनिल कपूरकडे इशारा होता. कारण यात आश्चर्याची कोणतीच गोष्ट नाही. असो.. कर्माची फळं कधी ना कधी मिळतातच’, असं एकाने लिहिलं. तर ‘आता कुठे लोक याबद्दल मोकळेपणे बोलू लागले आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय.