वाढदिवशी ऐश्वर्या रायकडून मोठा खुलासा; म्हणाली “माझ्या आईला कॅन्सर..”

अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिचा 50 वा वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला. जीएसबी सेवा मंडळाकडून कॅन्सर पीडितांसाठी आयोजित एका कार्यक्रमात तिने हजेरी लावली आणि यावेळी तिने तिच्या आईविषयी मोठा खुलासा केला. कार्यक्रमाला आराध्या बच्चनसुद्धा उपस्थित होती.

वाढदिवशी ऐश्वर्या रायकडून मोठा खुलासा; म्हणाली माझ्या आईला कॅन्सर..
Aishwarya Rai with mother
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 02, 2023 | 2:43 PM

मुंबई : 2 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने नुकताच आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. कॅन्सर रुग्णांसोबत खास कार्यक्रम आयोजित करत तिने हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. मुंबईत जीएसबी सेवा मंडळाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला ऐश्वर्यासोबतच तिची मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसुद्धा उपस्थित होत्या. कॅन्सर पीडितांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने ती या कार्यक्रमाशी जोडली गेली होती. यावेळी ऐश्वर्याने तिच्या आईलाही कॅन्सर झाल्याचा खुलासा केला. या वर्षाच्या सुरुवातीला वृंदा यांना कॅन्सरचं निदान झालं होतं आणि आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचं ऐश्वर्याने स्पष्ट केलं.

या कार्यक्रमात ऐश्वर्याने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मीडिया आणि उपस्थितांशी बोलताना ऐश्वर्याला अश्रू अनावर झाले. यावेळी तिने आईला कॅन्सर झाल्याचं सांगितलं. “ओके, मला हे बोलायला पाहिजे की नाही माहीत नाही, पण कॅन्सर या आजाराने आमच्या आयुष्यालाही स्पर्श केला आहे. आधी माझ्या बाबांना आणि त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला माझी आई कॅन्सरग्रस्त झाली होती. पण आता ती त्यातून बाहेर पडली आहे. अनेकांकडून मिळालेल्या प्रेम, आशीर्वादामुळे आणि खूप साऱ्या प्रतिभावान डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ती आता ठीक आहे”, अशा शब्दांत ऐश्वर्या व्यक्त झाली.

“पण कॅन्सर रुग्णांसाठी आम्ही करत असलेलं काम हे त्यामागचं कारण नाही. त्याचा फटका आमच्या कुटुंबालाही बसला आहे, म्हणून आम्ही हे समाजकार्य करतोय, असं नाही. किंबहुना त्याआधीपासून आम्ही या सेवेशी जोडलेलो आहोत. हे सर्व करत असताना माझ्या आईलाही कॅन्सर होणं, हे फक्त घटनात्मक आहे”, असंही ती पुढे म्हणाली. यावेळी ऐश्वर्याने अनेकांचे आभार मानले.

“आजचा दिवस यापेक्षा अविस्मरणीय असूच शकत नाही. आयुष्यात यापुढेही मी माझं कर्म करत राहीन आणि लोकांना माझ्याकडून जितकी मदत करता येईल, तितकी करेन. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे मी हे सर्व करू शकतेय. तुम्ही मला ती ताकद आणि शक्ती देता”, अशा शब्दांत ऐश्वर्याने कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी तिने माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत आणि कॅन्सर पीडितांसोबत केक कापत वाढदिवस साजरा केला. मात्र करवा चौथचा उपवास असल्याने तिने तो केक खाल्ला नाही.