Aishwarya Rai: ऐश्वर्या राय तिच्या बॉयफ्रेंड्सबद्दल..; सहअभिनेत्रीचा मोठा खुलासा

Aishwarya Rai: ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याची भुरळ मिस इंडिया स्पर्धेदरम्यानच अनेकांना पडली होती. अभिनेत्री मिता वशिष्ठने ऐश्वर्याला पहिल्यांदा पाहिल्याचा अनुभव सांगत तिच्या सौंदर्याबद्दल आणि मिस वर्ल्ड झाल्यानंतरच्या एका खास भेटीचा किस्सा शेअर केला आहे.

Aishwarya Rai: ऐश्वर्या राय तिच्या बॉयफ्रेंड्सबद्दल..; सहअभिनेत्रीचा मोठा खुलासा
Aishwarya Rai and Mita Vasisht
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2026 | 1:50 PM

Aishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्याची चर्चा आजही जगभरात होत असते. 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वीही ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याने आणि व्यक्तिमत्त्वाने अनेकांना प्रभावित केलं होतं. आता अभिनेत्री मिता वशिष्ठने ऐश्वर्याला पहिल्यांदा पाहिल्याचा अनुभव सांगितला आहे. मिस इंडिया स्पर्धेदरम्यान ऐश्वर्याला पाहून उपस्थित लोक कसे भारावून गेले होते, याचा खास किस्सा तिने शेअर केला आहे. ‘तिच्यावरून कोणाचीही नजर हटत नव्हती’, अशा शब्दांत मिताने ऐश्वर्याच्या सौंदर्याचं वर्णन केलं. मिता वशिष्ठने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या रायसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. रेडिफच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तिने ऐश्वर्याला पहिल्यांदा मिस इंडिया स्पर्धेदरम्यान पाहिल्याचं सांगितलं. त्या वेळी ऐश्वर्याने मिस इंडिया स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं होतं, तर सुष्मिता सेनने विजेतेपद मिळवलं होतं.

“तिच्याकडे पाहताना लोक अक्षरशः..”

या स्पर्धेच्या काही निवड फेऱ्यांमध्ये मिता उपस्थित होती. अंतिम परीक्षक मंडळात त्यांचा समावेश नव्हता, मात्र तिने ऐश्वर्याला जवळून पाहिलं होतं. यावेळी मिता म्हणाली, ऐश्वर्याला तिचं सौंदर्य किती खास आहे, याची पूर्ण जाणीव होती. तिच्याकडे पाहताना लोक अक्षरशः थक्क होत होते. अनेक फेऱ्यांमध्ये तिच्यावरून कोणाचीही नजर हटत नव्हती. त्या वेळी ऐश्वर्या तरुण होती, तिला फारसा अनुभव नव्हता; मात्र चित्रपटसृष्टीत स्टार होण्याची तिची इच्छा स्पष्ट दिसत होती, असंही मिताने सांगितलं.

Loading...

ऐश्वर्याशी झालेल्या भेटीचा किस्सा

मिताने ऐश्वर्याशी झालेल्या आणखी एका भेटीचा किस्साही सांगितला. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर एका स्क्रीनिंगदरम्यान ती दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्याकडे गेली होती. त्यावेळी तिने स्वतःची ओळख करून देत, ‘मी ऐश्वर्या राय आहे. नुकताच मी मिस वर्ल्डचा किताब जिंकला आहे आणि मला चित्रपटांमध्ये काम करायचं आहे,’ असं सांगितलं होतं.

मिताने पुढे सांगितलं की, त्या काळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (NSD) प्रशिक्षण घेतलेल्या कलाकारांचा चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. अभिनयाचं प्रशिक्षण, अनुभव आणि मेहनत यांना ते अधिक महत्त्व देत असत. त्यामुळे मिस वर्ल्ड झालेली एखादी व्यक्ती सहज अभिनेत्री होऊ शकते, ही गोष्ट त्यांना सुरुवातीला पटत नव्हती. मात्र चित्रपटसृष्टीचं गणित वेगळं असतं. मिस वर्ल्डसारखा किताब मिळवलेल्या व्यक्तीकडे असलेली लोकप्रियता आणि प्रभाव अनेकदा अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेल्या कलाकारापेक्षाही अधिक असू शकतो, याची जाणीव त्यांना नंतर झाली.

‘ताल’मध्ये केलं एकत्र काम

मिता वशिष्ठ आणि ऐश्वर्या राय यांनी सुभाष घई यांच्या ‘ताल’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी दोघींच्या करिअरचे टप्पे वेगवेगळे होते. ऐश्वर्या तुलनेनं नवीन होती आणि आपल्या भूमिकांसाठी ती दिग्दर्शक सुभाष घई यांच्या मार्गदर्शनावर अवलंबून होती. तर मिताला अभिनयाचा अनुभव होता आणि आपल्या भूमिकेबाबत ती ठाम होती. गरज पडल्यास ती दिग्दर्शकाशी मतभेदही व्यक्त करत असत. मिताने असंही सांगितलं की, ऐश्वर्या तिच्याशी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि प्रेमसंबंधांबद्दलही चर्चा करायची.

“त्यावेळी मी लग्न आणि त्यातील भावनिक गुंतागुंत आधीच अनुभवली होती, तर ऐश्वर्या अजूनही तिच्या वैयक्तिक नात्यांमध्ये स्थिरावत होती. ऐश्वर्या तिच्या प्रेमसंबंधांबद्दल माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायची. तिच्या तेव्हाच्या आणि आणि आताच्या बॉयफ्रेंड्सबद्दल आणि तिच्या निवडींमागील कारणांबद्दल ती माझ्यासोबत चर्चा करायची”, असा खुलासा मिताने केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us