Priyadarshini Indalkar : ना अमृता ना सोनाली! रवी जाधव यांच्या सिनेमात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीची वर्णी, म्हणाली, माझं हे नवं रूप…
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री रवी जाधव यांच्या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लावणीच्या अदाकारीतून मराठी मातीचा साज खुलवणाऱ्या दोन चेहऱ्यांभोवती गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या उत्सुकतेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ फेम अभिनेत्री रवी जाधव यांच्या सिनेमात झळकणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ या आगामी चित्रपटातील वैदेही परशुरामी म्हणजेच मथुरा परितेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर म्हणजेच संगीता परितेकर यांचे लावणीमय रूप नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून समोर आलं आहे.
‘नटरंग’नंतर तब्बल 16 वर्षांनी झी स्टुडिओज आणि रवी जाधव ही जोडी पुन्हा एकदा तमाशा आणि लावणीच्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे. ‘फुलवरा’च्या माध्यमातून लावणीचा पारंपरिक बाज, कलावंतांचं आयुष्य आणि या कलेसाठी त्यांनी घेतलेला संघर्ष मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या व्यक्तिरेखांबद्दल कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. आता त्यांच्या व्यक्तिरेखा समोर आल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, ‘लावणी ही महाराष्ट्राची ओळख अभिमानानं मिरवणारी लोककला आहे. ‘फुलवरा’तील या दोन कलाकारांचे रूप समोर आणणे आमच्यासाठी विशेष महत्त्वाचे होते. हे केवळ चेहरा अनावरण नसून आपल्या मातीतल्या कलेला आणि तिचा वारसा जपणाऱ्या कलावंतांना दिलेली मानवंदना आहे.’
वैदेही परशुरामी म्हणाली, ‘लावणी ही केवळ नृत्याची शैली नाही, तर तिच्या प्रत्येक अदाकारीमागे एक स्वतंत्र भावविश्व, ताकद आणि आत्मभान दडलेलं आहे. ‘फुलवरा’मधील माझी व्यक्तिरेखा साकारताना या कलेचा बारकाईनं अभ्यास करण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची संधी मिळाली. या भूमिकेनं अभिनेत्री म्हणून माझ्यासमोर अनेक नवी आव्हानं उभी केली, पण त्याचबरोबर खूप काही शिकवलंही. आजवर प्रेक्षकांनी मला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे; मात्र ‘फुलवरा’मधील माझं हे रूप त्यांच्यासाठी नक्कीच वेगळं ठरेल.’
View this post on Instagram
काय म्हणाली प्रियदर्शिनी इंदलकर?
प्रियदर्शिनी इंदलकर म्हणते, ‘एखाद्या भूमिकेचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर येतो, तेव्हा कलाकारासाठी तो क्षण नेहमीच खास असतो. ‘फुलवरा’च्या बाबतीत हा अनुभव अधिकच अविस्मरणीय आहे. कारण हा केवळ माझ्या व्यक्तिरेखेचा चेहरा समोर येण्याचा क्षण नसून, एका समृद्ध लोककलेच्या परंपरेशी जोडल्या गेलेल्या प्रवासाची सुरुवात आहे. लावणीच्या विश्वात प्रवेश करताना तिचा डौल, तिच्यातील नजाकत आणि त्यामागची मेहनत जवळून अनुभवता आली. प्रेक्षकांनी आजवर माझ्या कामाला दिलेलं प्रेम लक्षात घेता, माझं हे नवं रूप त्यांच्यासाठी एक सुखद धक्का ठरेल, अशी आशा आहे.’
दरम्यान, झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित ‘फुलवरा’ हा चित्रपट 14 जानेवारी 2027 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
