Akshay Kumar ने 19 महिन्यात बुडवले निर्मात्यांचे 300 कोटी रुपये; नेमकं काय चुकतंय?

| Updated on: Mar 05, 2023 | 8:24 AM

अक्षय कुमारचे चित्रपट पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतायत असं नाही. याआधीही अक्षयने त्याच्या करिअरमध्ये असा काळ पाहिला आहे. एकेकाळी त्याचे सलग 16 चित्रपट फ्लॉप झाले होते.

Akshay Kumar ने 19 महिन्यात बुडवले निर्मात्यांचे 300 कोटी रुपये; नेमकं काय चुकतंय?
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : भुल भुलैय्या 2, दृश्यम 2 आणि पठाण यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांनी कोरोना काळानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. या चित्रपटांची कमाई पाहिल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचे जुने दिवस परत आले, असं चित्रपट व्यापार विश्लेषकांना वाटलं. मात्र अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे आकडे उलट्या दिशेने फिरवले. अक्षयच्या गेल्या दहा वर्षांतील करिअरमधील हा सर्वांत कमी ओपनिंग कमाई करणारा चित्रपट ठरला. सेल्फी तर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र त्याआधीही अक्षयचे जवळपास पाच चित्रपट दणक्यात आपटले. गेल्या 19 महिन्यात बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने निर्मात्यांचे तब्बल 300 कोटी रुपये बुडवले आहेत.

जवळपास गेल्या 19 महिन्यात अक्षयचे सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यापैकी सेल्फी हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये आहे. याशिवाय त्याचा सूर्यवंशी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. मात्र बेल बॉटम, बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन आणि राम सेतू हे चित्रपट फ्लॉप ठरले. विशेष म्हणजे शाहरुख खानच्या एकट्या ‘पठाण’ या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. मात्र अक्षयच्या या पाच चित्रपटांची कमाई ‘पठाण’च्या निम्म्या कमाईएवढीही नाही.

रिपोर्ट्सनुसार या पाच चित्रपटांचा एकूण बजेट हा 620 कोटी रुपये होता. मात्र हे चित्रपट जगभरात फक्त 324 कोटी रुपयांचा गल्ला जमवू शकले. या चित्रपटांनी भारतात 273 कोटी रुपये आणि परदेशात 51 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यामुळे निर्मात्यांना 300 कोटी रुपयांचा फटका बसल्याचं स्पष्ट होतंय. मात्र ओटीटीने निर्मात्यांचं दु:ख काही प्रमाणात कमी केलं असणार.

हे सुद्धा वाचा

बेल बॉटम, बच्चन पांडेची कमाई

21 ऑगस्ट 2021 रोजी अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बरीच चर्चा होती. मात्र जवळपास 70 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात फक्त 33.31 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर परदेशात 14.31 कोटी रुपयांची कमाई झाली होती. तर जवळपास 165 कोटी रुपये बजेट असलेल्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाने भारतात 50.54 कोटी रुपये आणि परदेशात 10.03 कोटी रुपयांची कमाई केली.

सम्राट पृथ्वीराज, राम सेतू आणि रक्षाबंधनसुद्धा फ्लॉप

अक्षय कुमार आणि निर्मात्यांना त्याच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून फार अपेक्षा होत्या. या चित्रपटाचा बजेट जवळपास 200 कोटी रुपये असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाहीत. भारतात त्याने 66 कोटी रुपये आणि परदेशात फक्त 8 कोटी रुपयांची कमाई केली. रक्षाबंधन या चित्रपटाचं समिक्षकांकडून कौतुक झालं. मात्र कमाईच्या बाबतीत या चित्रपटालाही फटका बसला. 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशात 48.63 कोटी रुपये आणि परदेशात 11 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

25 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राम सेतू’लाही प्रेक्षकांकडून जेमतेम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचं बजेट 85 कोटी रुपये इतकं होतं. भारतात त्याने 74.7 आणि परदेशात 7.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

अक्षय कुमारने स्वीकारली फ्लॉपची जबाबदारी

अक्षय कुमारचे चित्रपट पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतायत असं नाही. याआधीही अक्षयने त्याच्या करिअरमध्ये असा काळ पाहिला आहे. एकेकाळी त्याचे सलग 16 चित्रपट फ्लॉप झाले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने त्याच्या फ्लॉप चित्रपटांवर प्रतिक्रिया दिली होती. फ्लॉप चित्रपटांची 100 टक्के जबाबदारी ही माझीच आहे, असं तो म्हणाला होता. प्रेक्षकांच्या आवडीनिवडीसोबत स्वत:लाही बदलणं गरजेचं आहे, असं मत त्याने मांडलं.