Ranbir Alia | आलिया भट्ट फोटो लीकप्रकरणी रणबीर कपूरने उचललं मोठं पाऊल

दोन अनोळखी लोक तिच्या समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून कॅमेराने सर्व शूट करत होते. आलियाच्या या पोस्टनंतर आता बॉलिवूडमधल्या इतर सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला होता.

Ranbir Alia | आलिया भट्ट फोटो लीकप्रकरणी रणबीर कपूरने उचललं मोठं पाऊल
Alia Bhatt and Ranbir Kapoor
Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 10, 2023 | 10:48 AM

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टच्या फोटो लीकप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता. आलिया तिच्या घरात असताना समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून काही पापाराझींनी तिचा फोटो क्लिक केला. लिव्हिंग रुममधील हा फोटो जेव्हा एका वेबसाइटने पब्लिश केला, तेव्हा आलियाचा चांगलाच पारा चढला. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने फटकारलं होतं. तिच्या या पोस्टनंतर बॉलिवूडमधल्या बऱ्याच कलाकारांनी तिची साथ दिली होती. सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीचा मुद्दा सेलिब्रिटींनी उचलून धरला. त्यानंतर आता रणबीर कपूरने या घटनेवर मौन सोडलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर म्हणाला, “हे प्रायव्हसीचं सर्रास उल्लंघन आहे. तुम्ही माझ्या घरी घुसू शकत नाही, शूट करू शकत नाही. तिथे काहीही होऊ शकतं, ते माझं घर आहे. हे सगळं करण्याची काहीच गरज नाही. याप्रकरणी आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत. मी त्याबद्दल फार काही बोलू इच्छित नाही. पण ती घटना अत्यंत खालच्या पातळीची होती.”

पापाराझी कल्चरविषयी रणबीर पुढे म्हणाला, “आम्ही पापाराझींचा आदर करतो. माझ्या मते ते आमच्या कल्चरचा एक भाग आहेत. आमचं काम एकमेकांमुळेच चालतं, ते आमच्यासोबत काम करतात आणि आम्ही त्यांच्यासोबत मिळून काम करतो. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे खूप त्रास होतो. लोकांच्या अशा वागणुकीवर मलाच लाज वाटते.”

नेमकं काय घडलं होतं?

22 फेब्रुवारी रोजी आलिया भट्टने तिच्यासोबत घडलेली घटना सांगण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने सांगितलं की दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्या घरातील तिचे प्रायव्हेट फोटो क्लिक केले. आलिया तिच्या लिव्हिंग रुममध्ये बसली होती, तेव्हा तिच्या परवागनीशिवाय समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून तिचे फोटो क्लिक करण्यात आले होते. यावरून आलियाने संबंधित न्यूज पोर्टलला फटकारलं.

‘तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते आणि तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी मला पाहतंय. मी उठून पाहिलं तर समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून दोन व्यक्ती माझ्याकडे कॅमेरा लावून पाहत होते. कोणत्या जगात हे असं करणं योग्य आहे,’ असा सवाल तिने केला होता.

‘एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची ही सर्वांत वाईट गोष्ट आहे. एक अशी मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. आज मला हे म्हणावं लागतंय की सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत’, असं लिहित तिने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केलं होतं. आता याप्रकरणी रणबीर आणि आलियाने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.