‘गंगुबाई काठियावाडी’च्या विरोधात कामाठीपुराचे रहिवाशी; हायकोर्टात दाखल केली याचिका

| Updated on: Feb 22, 2022 | 5:53 PM

Gangubai Kathiawadi या चित्रपटाचं प्रदर्शन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना आता प्रदर्शनाच्या वाटेत नवे अडथळे निर्माण झाले आहेत.

गंगुबाई काठियावाडीच्या विरोधात कामाठीपुराचे रहिवाशी; हायकोर्टात दाखल केली याचिका
‘गंगूबाई काठियावाड़ी’
Follow us on

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाचं प्रदर्शन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना आता प्रदर्शनाच्या वाटेत नवे अडथळे निर्माण झाले आहेत. आमदार अमिन पटेल (Amin Patel) आणि दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा भागातील रहिवाश्यांनी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात परिसराचं नाव वापरल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटातून कामाठीपुरा हा शब्द सेन्सॉर करावा किंवा काढून टाकावा अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. श्रद्धा सुर्वे यांनी ही याचिका दाखल केली आहे. मंगळवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली असून चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार असल्याने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार असल्याचं खंडपीठाने सांगितलं.

याशिवाय आमदार अमीन पटेल यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेतही हाच आक्षेप घेण्यात आला आहे. यावरही बुधवारी सुनावणी होईल. लेखक एस हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातील एका अध्यायावर आधारित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट गंगुबाईच्या भूमिकेत आहे. चित्रपटात कामाठीपुरा परिसराची प्रतिमा मलिन केल्याने तिथल्या रहिवाशांची बदनामी होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

भन्साळींच्या ‘गंगूबाई..’मागे वादांचा ससेमिरा
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावर आक्षेप घेण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी खुद्द गंगूबाई यांच्या मुलाने देखील या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता. गंगूबाई यांचे पुत्र बाबूजी रावजी शाह यांनी आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि प्रख्यात लेखक हुसेन झैदी यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. गंगूबाईच्या मुलाने असे म्हटले की, हुसेन झैदी यांच्या पुस्तकाचे काही भाग त्यांचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारे असून, यामुळे कुटुंबाची बदनामी होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित थांबवावे आणि पुस्तकातील काही आक्षेपार्ह भाग चित्रपटाच्या कथेतून वगळावेत, अशी त्यांची इच्छा आहे. बाबूजी रावजी शाह म्हणाले की, जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून स्थानिक लोकांकडून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय एका वाईट कुटुंबातील म्हणून त्यांना हिणवले जात आहे. तसेच यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.