प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या; हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह

हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या; कुटुंबीयांसोबत चाहत्यांनाही बसला मोठा धक्का

प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या; हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह
Actor and dancer Stephen Boss
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 15, 2022 | 8:19 AM

लॉस एंजेलिस: प्रसिद्ध अभिनेता, डान्सर आणि डिजे स्टीफन बॉसचं निधन झालं. मंगळवारी 13 डिसेंबर रोजी एका हॉटेलच्या रूममध्ये स्टीफनचा मृतदेह आढळला. त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्टीफन बॉस हा ‘द एलिन डी जॉनर्स’ आणि ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ यांसारख्या शोजसाठी लोकप्रिय होता. आपल्या दमदार नृत्यकौशल्याच्या जोरावर त्याने प्रसिद्धी मिळवली होती. स्टीफनचा मोठा चाहतावर्ग आहे.

हॉटेल रूममध्ये आढळला मृतदेह

टीएमएजने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांना स्टीफनचा मृतदेह लॉस एंजेलिसमधील एका हॉटेलच्या रूममध्ये आढळला. घरातून निघताना त्याने आपली कार नेली नव्हती, अशी माहिती स्टीफनची पत्नी एलिसन हॉकरने दिली. तो त्याच्या कारशिवाय कुठेच जायचा नाही. त्यामुळे ही बाब संशयास्पद मानली जातेय.

स्टीफन बॉसच्या निधनाचं वृत्त हे त्याच्या कुटंबीयांसोबतच चाहत्यांसाठीही धक्कादायक आहे. त्याने स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केल्याचंही म्हटलं जातंय. मात्र स्टीफनने हे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

“अत्यंत जड अंतःकरणाने मला हे सांगावं लागतंय की माझा पती स्टीफनने या जगाचा निरोप घेतला. तो त्याच्या कुटुंबाला, मित्रांना खूप महत्त्व द्यायचा. त्याच्यासाठी प्रेम हेच सर्वस्व होतं. आमच्या कुटुंबाचा तो पाठीचा कणा होता. तो उत्तम पिता आणि पती होता. चाहत्यांसाठी तो एक प्रेरणा होता. त्याची सकारात्मक वृत्ती नेहमीच आठवणीत राहील,” अशा शब्दात स्टीफनची पत्नी एलिसन हॉकरने भावना व्यक्त केल्या. स्टीफन आणि एलिसनने 2013 मध्ये लग्न केलं होतं.