
बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते विविध पोस्ट लिहितच असतात. त्याचसोबत ते ब्लॉगमध्येही आमचे विचार मोकळेपणे मांडतात. 83 वर्षीय बिग बी एकवेळ आयुष्यात इतर गोष्टी विसरतील, परंतु नियमित ब्लॉग लिहायला कधीच विसरत नाहीत. नुकत्याच एका ब्लॉगमध्ये त्यांनी त्यांच्या भावना मोकळेपणे मांडल्या आहेत. परंतु त्यांचा हा ब्लॉग वाचल्यानंतर चाहते पेचात पडले आहेत. अमिताभ बच्चन यांनी इतका दु:खद संदेश का लिहिला, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. बिग बींनी बदलती वेळ आणि वेळेनुसार बदलत्या लोकांबद्दल ही खास पोस्ट लिहिली आहे.
या ब्लॉगची सुरुवात त्यांनी वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींसोबत केलीये. ‘तुमने हमें पूज पूज कर पत्थर कर डाला, वो जो हम पर जुमले कसते हैं , हमें जिंदा तो समझते हैं’ (माझी पूजा करून तू मला दगड बनवलंस. जे माझी थट्टा करतात, त्यांना किमान मी जिवंत तरी वाटतो). या ब्लॉगमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘वेळ बदलते, जग बदलतं, वागणूक, सवयी बदलतात, संस्कृती बदलते, लोक बदलतात. जी लोकं तेव्हा होती, ती आता नाहीत आणि आता लवकरच जी लोकं आता आहेत, ती तेव्हाचे संदर्भ बनतील.’
भूतकाळात जगणं निरर्थक आहे आणि भूतकाळ फक्त आठवणी म्हणून जपलं पाहिजे, असंही त्यांनी ब्लॉगमध्ये पुढे लिहिलंय. त्यानंतर त्यांनी पुन्हा हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींचा उल्लेख करत त्या ओळी आजही प्रासंगिक असल्याचं म्हटलंय.
याआधीही त्यांनी एक्स अकाऊंटवर ‘निकाल दिया’ अशी पोस्ट लिहिली होती. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘अभिषेकने तुम्हाला घराबाहेर काढून टाकलं का’, असा प्रश्न एकाने विचारला होता. तर ‘जया बच्चन यांच्यासोबत का भांडण केलं’, असं दुसऱ्याने म्हटलं होतं. यावरून काही नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्ससुद्धा शेअर केले. ‘जयाजींची माफी मागून घ्या, कदाचित पुन्हा बोलावून घेतील’ अशी मस्करी नेटकऱ्यांनी केली होती.