‘नवराच सर्वस्व आहे का तुमचा?’, पती हिमांशूबद्दल कमेंट करणारीला अमृताने सुनावलं

अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच मुंबईत घर घेतलं असून या घरात तिने गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशाच्या व्हिडीओत पती कुठेच दिसत नसल्याने काही नेटकऱ्यांनी तिला प्रश्न विचारला. त्यावर अमृताने त्यांना युट्यूबवर जाऊन पूर्ण व्हिडीओ पाहण्याचा सल्ला दिला.

नवराच सर्वस्व आहे का तुमचा?, पती हिमांशूबद्दल कमेंट करणारीला अमृताने सुनावलं
Amruta Khanvilkar and Himanshu Malhotra
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 13, 2025 | 8:22 AM

अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशाचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृतासोबत तिची आई, बहीण आणि वडील दिसून आले. मात्र पती हिमांशू मल्होत्रा दिसला नाही. यावरून एका नेटकऱ्याने तिला प्रश्न विचारला असता अमृताने ‘युट्यूब’वर जाऊन व्हिडीओ पाहण्यास सांगितलं. त्यानंतरही आणखी एका युजरने अमृताच्या पतीवरून कमेंट केली. ‘पतीबद्दल विचारणाऱ्याला तिने युट्यूबवर जाऊन व्हिडीओ पाहण्यास सांगितलं. तिचं खरंच तिच्या पतीसोबत विचित्र नातं असल्याचं पहायला मिळतंय’, असं संबंधित युजरने लिहिलं. त्यावर आता अमृताने सडेतोड उत्तर दिलं आहे.

अमृता खानविलकरची प्रतिक्रिया

‘यात विचित्र काय आहे? मला आमच्या गृहप्रवेशाचा रिल व्हिडीओ काढायचा होता आणि हिमांशूला पोहोचायला उशिर झाला. लोक त्याच्याबद्दल विचारत होते, म्हणून मी त्यांना युट्यूबवर जाऊन पूर्ण व्हिडीओ पाहण्याचा सल्ला दिला. कारण थोड्या वेळानंतर तो गृहप्रवेशाला पोहोचला होता. यात विचित्र असं काय आहे? प्रोफाइलवर डीपीसुद्धा न ठेवणारी आणि चेहरे नसलेली तुम्ही लोकं इतकं नकारात्मक होऊ नका. एखादी अभिनेता/अभिनेत्री किंवा सेलिब्रिटी काही म्हणत नाही याचा अर्थ असा नाही की ते काही म्हणू शकत नाहीत. आणि वैशाली म्हात्रे जरा समजून बोला.. आई, वडील, बहीण हे कुटुंब नसतं का? की नाही, नवराच सर्वस्व आहे का तुमचा? तसं असेल तर फारच बिचाऱ्या आहात तुम्ही आणि तुमचं आयुष्य’, अशा शब्दांत अमृताने सुनावलंय.

अमृताने मुंबईत नवकोर घर घेतलं असून 22 व्या मजल्यावर असलेलं हे घर अमृतासाठी खूपच खास आहे. ‘नव्या वर्षाची.. नवी सुरुवात. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’. एकम म्हणजे एक. जिथून सगळंच नव्याने सुरू होतं. उत्सुकता, समाधान, प्रेम, आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ. तुमच्या शुभाशीर्वादांची साथ अशीच कायम राहू दे,’ अशी पोस्ट लिहित अमृताने गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला आहे. स्वप्नांच्या या शहरात घर विकत घेणं हे खरंच एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं वाटतंय, अशा शब्दांत अमृता व्यक्त झाली. मुंबईतील टोलेजंग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर अमृताचं हे घर आहे.