LPG Black Marketing : सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी महाराष्ट्रात आतापर्यंत कुठे-कुठे धाडी? किती सिलिंडर जप्त? जाणून घ्या डिटेल्स
Maharashtra LPG Black Marketing : मध्य पूर्वेतील युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायूचं संकट निर्माण झालं आहे. एलपीजीचा तुटवडा जाणवत आहे. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात धाड सत्र राबवण्यात आलं.

घरगुती वापराच्या सिलिंडरचा काळाबाजार काही केल्या बंद होईना अशी स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाकडून धाडसत्र राबविले जात आहे. अशाच पथकाने गोंदिया जिल्ह्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल 45 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यात 10 सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात पुरवठा विभागाने पुन्हा एकदा छापेमारीची मोठी कारवाई केली.अंबड शहर,वडीगोद्री फाटा आणि पाचोड टोलनाका परिसरात छापेमारी करत पूरवठा विभागाने जवळपास 17 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्यानंतर अनेक ठिकाणी छोटे-मोठे हॉटेल व्यवसायिक आणि हातगाड्या चालक बेकायदेशीरपणे घरगुती गॅसचा वापर करत असल्यामुळे पुरवठा विभागाने त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला.
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भुसावळ महसूल विभागाच्या वतीने पथकं नेमण्यात आली. ठिकठिकाणी सकाळपासून महसूल विभाग छापेमारी करत आहे. यात छोटे-मोठे हॉटेल व्यवसायिक घरगुती गॅसचा वापर करत असून हे रोखण्यासाठी भुसावळ महसूल विभागाच्या वतीने पथकं नेमण्यात आली आहेत. आज 19 हॉटेलवर छापे टाकत 12 घरगुती सिलेंडर जप्त करण्याची तहसील विभागाने कारवाई केली.
नंदुरबार जिल्ह्यात काय कारवाई?
नंदुरबार जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या अनधिकृत वापरावर प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या आदेशानुसार दक्षता पथकांनी जिल्ह्यातील तब्बल ३० ठिकाणी छापे टाकत तपासणी केली आहे. या कारवाईत घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सहा तालुक्यांमध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वितरकांना समज देण्यात आली असून, दोन दिवसांचा गॅस साठा ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुमारे १० हजार सिलेंडरचा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ग्रामीण भागातील अडचणी सोडवण्यावरही भर देण्यात येत आहे. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि नागरिकांना सुरळीत पुरवठा मिळावा यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
करमाळ्यात किती गॅस जप्त केले?
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील इंद्रानगर भागात विजय बोराडे नावाच्या व्यक्तीकडे गॅस सिलेंडरचा अवैध साठा असल्याची खात्रीशीर माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रशासकीय पथकाने सदर ठिकाणी तपासणी केली. यावेळी संबंधितांकडे कोणताही वैध परवाना आढळून आला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, हे सिलेंडर सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून आडव्या स्थितीत ठेवण्यात आले होते, ज्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती.
या कारवाईत IOCL, HPCL आणि BPCL या नामांकित कंपन्यांचे सिलेंडर जप्त करण्यात आले. यामध्ये खालीलप्रमाणे साठ्याचा समावेश आहे.
१४.२ कि.ग्रॅ. (घरगुती): १५ नग
५ कि.ग्रॅ. (घरगुती): ०३ नग
५ कि.ग्रॅ. (व्यावसायिक): ०२ नग
सदर साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रुघ्न मोतीराम चव्हाण आणि लिपिक-टंकलेखक उदय गोडगे यांचा समावेश होता.
सोलापुरात कुठे धाड टाकली?
सोलापूर शहर अन्न पुरवठा विभागाच्या पथकाकडून शहरात धाडसत्र सुरु. शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी केल्याने कारवाई. पावभाजी, चायनीज सेंटरवरुन तब्बल 41 टाक्या ताब्यात घेतल्या. शहर अन्न धान्य पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांची माहिती. पार्क चौक, जुळे सोलापूर, विजयपूर रोड, कंबर तलाव या भागातील चायनीज आणि पावभाजी सेंटरवर धाडी टाकण्यात आल्या. विजापूर नाका, सदर बाजार आणि जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु.
धुळे शहर आणि शिंदखेडामध्ये काय कारवाई?
युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिलेंडरची कमतरता भासत आहे. यातच धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा होत असलेला काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दक्षता पथक तयार करण्यात आले. पुरवठा विभाग मार्फत धुळे शहरातील एकूण 24 हॉटेल्स खानावळी येथे तपासणी केली असता 15 घरघुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले तर शिंदखेडा मध्ये बारा सिलेंडर जप्त करण्यात आले. सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आता पथक नेमण्यात आले असून घरगुती वापराचे सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी काहीजण आपल्या हॉटेलमध्ये त्याचा उपयोग करत आहेत. यावर आता पुरवठा विभागाने कारवाई करायला सुरुवात केली आहे.
