सुशांतसोबतचे सर्व फोटो फाडले अन्..; अडीच वर्षे वाट पाहिल्यानंतर अंकिताने केली ही गोष्ट

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता सुशांतविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ब्रेकअप झाल्यानंतर जवळपास अडीच वर्षे त्याची प्रतीक्षा केल्याचं अंकिताने स्पष्ट केलं. मात्र अचानक एकेदिवशी तिने या सर्वातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यादिवशी नेमकं काय घडलं, ते वाचा..

सुशांतसोबतचे सर्व फोटो फाडले अन्..; अडीच वर्षे वाट पाहिल्यानंतर अंकिताने केली ही गोष्ट
Ankita Lokhande and Sushant Singh Rajput
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 15, 2023 | 2:07 PM

मुंबई : 15 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांचं नातं जगजाहीर होतं. या दोघांनी आपल्या करिअरची सुरुवात एकाच वेळी केली होती. एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून त्यांना लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. याच मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी ब्रेकअप केला. एका मुलाखतीत अंकिताने ब्रेकअपनंतरच्या काळाचा खुलासा केला. सुशांतपासून दूर गेल्यानंतर अडीच वर्षांपर्यंत त्याची प्रतीक्षा केल्याचं अंकिताने सांगितलं. मात्र सुशांत तिच्या आयुष्यात परतलाच नाही.

बीबीसी न्यूज हिंदीला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “जवळपास अडीच वर्षांपर्यंत मी याच भ्रमात होते की आमच्याच गोष्टी ठीक होतील. आमचं नातं पुन्हा मार्गावर येईल. पण एके दिवशी, 31 जानेवारी रोजी मी त्यातून बाहेर पडण्याचं ठरवलं. माझ्या घरात आमच्या दोघांचे खूप सारे फोटो होते. त्यादिवशी मी मनाशी निर्णय पक्का केला आणि आईला ते सर्व फोटो काढून टाकायला सांगितले. तुमच्या आयुष्यातील जागा रिकामी केली तरच त्याठिकाणी नवीन व्यक्ती येऊ शकेल.”

अंकिताने सांगितलं की तिच्या आईने सुशांतसोबतचे सर्व फोटो घरातून काढून टाकले आणि नंतर ते फाडले. त्यादिवशी अंकिताला खूप रडू कोसळलं होतं. “मी माझ्या आईला सांगितलं की जोपर्यंत त्याचे फोटो, आठवणी असेच माझ्यासमोर असतील, तोपर्यंत माझ्या आयुष्यात नवीन व्यक्ती येणारच नाही. मी ते फोटो काढले नाहीत, पण मी माझ्या आईला सांगितलं. मी माझ्या रुममध्ये गेले आणि त्यादिवशी खूप रडले. आईने ते सर्व फोटो काढले आणि फाडून टाकले. तो सर्व गोष्टींचा शेवट होता. मी त्याची वाट पाहिली, मी सर्वकाही केलं होतं. त्या घटनेच्या सहा महिन्यांनंतर विकी माझ्या आयुष्यात आला”, असं अंकिताने स्पष्ट केलं.

अंकिताने डिसेंबर 2021 मध्ये विकी जैनशी लग्न केलं. बिग बॉसच्या सतराव्या सिझनमध्ये अंकिता आणि विकी स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. बिग बॉसच्या घरातही अंकिता सुशांतबद्दल व्यक्त झाली होती. सुशांतने रातोरात नातं संपवलं होतं, असं ती म्हणाली. मुनव्वर फारुकीशी बोलताना अंकिताने सांगितलं, “तो माझ्या आयुष्यातून अचानकच गेला. त्याला यश मिळत होतं आणि त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला फसवत होते. त्याने ब्रेकअपचं कारणसुद्धा मला सांगितलं नव्हतं.”