टीव्हीवर काम करते म्हणून लोक मला..; ‘अनुपमा’ फेम अभिनेत्रीकडून खंत व्यक्त

| Updated on: Apr 02, 2024 | 9:42 AM

स्टार प्लस वाहिनीवरील 'अनुपमा' या मालिकेतून अभिनेत्री रुपाली गांगुली घराघरात पोहोचली. रुपालीचे वडील अनिल गांगुली हे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहेत. मात्र जेव्हा ते आजारी होते, तेव्हा त्यांच्या उपचाराचा आणि घराचा खर्च उचलण्यासाठी रुपालीने काम करण्यास सुरुवात केली.

टीव्हीवर काम करते म्हणून लोक मला..; अनुपमा फेम अभिनेत्रीकडून खंत व्यक्त
Rupali Ganguly
Image Credit source: Instagram
Follow us on

‘अनुपमा’ या मालिकेतून अभिनेत्री रुपाली गांगुली घराघरात पोहोचली. रुपालीचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथालेखक अनिल गांगुली आहेत. वडिलांची प्रकृती ठीक नसताना त्यांच्या उपचाराचा खर्च उचलण्यासाठी रुपालीने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. मात्र यामुळे लोक मला कमी लेखू लागले आणि माझी कीव करू लागले, असं रुपालीने सांगितलं. दैनंदिन आणि वडिलांच्या उपचाराचा खर्च उचलण्यासाठी तिने मिळेल ते काम करण्यास प्राधान्य दिलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रुपाली या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

‘सीएनबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत रुपाली म्हणाली, “टेलिव्हिजनमध्ये काम करणं सुरुवातीला खूप संघर्षाचं होतं. कारण मला घरखर्च उचलायचा होता आणि त्यामुळे माझ्या वाटेला जे काम येईल ते मी करत गेले. मात्र यामुळे माझ्याकडे लोक तुच्छ नजरेने पाहू लागले होते. खासकरून बंगाली समुदायातील लोक आम्हाला जणू बहिष्कृतच ठरवत होते. मी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करतेय हे पाहून काहींना माझी कीव यायची. पण मी या सगळ्या गोष्टींचा विचार केला नाही. कारण मला माझ्या घराचा गाडा चालवायचा होता.”

हे सुद्धा वाचा

“माझे काही ध्येय नव्हते, स्वप्न नव्हते. एकच गोष्ट तेव्हा माझ्या मनात होती, ती म्हणजे माझ्या वडिलांना मला महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करायचं नाही. लिलावतीसारख्या चांगल्या रुग्णालयात त्यांचे उपचार व्हावेत अशी माझी इच्छा होती. यासाठी मी मिळेल ते काम करणं गरजेचं होतं. मी आणि माझा भाऊ जे काही कमवायचो, त्यातून संपूर्ण घराचा आणि वडिलांच्या उपचाराचा खर्च उचलला जायचा. मी माझ्या वडिलांसाठी काहीही करायला तयार होते. ते माझी प्रेरणा, माझा देव आहेत”, अशा शब्दांत रुपाली व्यक्त झाली.

संघर्षाच्या काळात वडिलांनी त्यांच्या क्षेत्रातील ओळखीच्या लोकांचे संपर्क देऊन माझी मदत केली नाही, याचे मी आभार मानते, असंही ती म्हणाली. शून्यातून सुरुवात केल्याने आज मी याठिकाणी पोहोचली, असं रुपालीने अभिमानाने सांगितलं. “टेलिव्हिजनवरील तुमचं दमदार अभिनय पाहून जेव्हा लोक तुम्हाला फोन करतात किंवा तुमच्या अभिनयाबद्दल, कामाबद्दल बातम्या लिहिल्या जातात, तेव्हा तो माझा विजय असतो. तेव्हा ते माझं यश असतं. या इंडस्ट्रीत काम करणं सोपं नाही”, असं रुपाली पुढे म्हणाली.