AR Rahman | ए. आर. रहमानच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी, महिलांचा विनयभंग; संगीतकारावर भडकले नेटकरी

ए. आर. रहमान यांच्या चेन्नईमधल्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत अनेक महिलांनी विनयभंग झाल्याचीही तक्रार केली. मात्र इतकं होऊनही गैरव्यवस्थापनाबद्दल माफी न मागितल्याने नेटकरी भडकले आहेत.

AR Rahman | ए. आर. रहमानच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी, महिलांचा विनयभंग; संगीतकारावर भडकले नेटकरी
चेन्नई कॉन्सर्टमधल्या घटनेवर ए. आर. रहमानची प्रतिक्रिया
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 11, 2023 | 2:59 PM

चेन्नई | 11 सप्टेंबर 2023 : प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी रविवारी चेन्नईमधल्या पनियूर इथल्या ‘आदित्यराम पॅलेस’मध्ये ‘माराकुमा नेंजाम’ नावाने म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. मात्र हा म्युझिक कॉन्सर्ट अनेकांसाठी धक्कादायक आणि त्रासदायक अनुभव ठरला. अपुऱ्या सोयीसुविधा आणि गर्दीची योग्य व्यवस्था न केल्याने त्याठिकाणी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर अनेकांनी आयोजकांना गैरव्यवस्थापनासाठी फटकारलं. कॉन्सर्टसाठी वैध तिकिटं असूनही प्रवेश का दिला नाही, याविषयी अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित तक्रार केली. काहींनी त्यांच्या अनुभवांचे व्हिडीओ पोस्ट केले. या सर्व परिस्थितीवर अखेर ए. आर. रहमान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गैरव्यवस्थापनामुळे अनेकांना त्रास

गर्दीचा आणि चेंगराचेंगरीचा फायदा घेत काही महिलांचा विनयभंग झाला. लहान मुलं त्यांच्या पालकांपासून दुरावली गेली. काहीजण त्यात जखमीसुद्धा झाले, असा असंख्य तक्रारी सोशल मीडियावर करण्यात येत आहेत. आयोजकांनी लोभापायी कॉन्सर्टची तिकिटं प्रमाणापेक्षा अधिक विकल्याचाही आरोप काहींनी केला.

ए. आर. रहमानची प्रतिक्रिया

घडलेल्या घटनेबाबत ए. आर. रहमान यांनी लिहिलं, ‘ज्यांनी कॉन्सर्टची तिकिटं खरेदी केली आणि घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे ज्यांना प्रवेश मिळाला नाही, त्यांनी कृपया आपल्या तिकिटाची कॉपी arr4chennai@btos.in वर शेअर करावी आणि त्याचसोबत तक्रारीबद्दल लिहावं. आमची टीम लवकरात लवकर प्रत्युत्तर देईल.’

‘काही लोक मला G.O.A.T म्हणतात… पण या वेळी सर्वांना जागृत करण्यासाठी मला बळीचा बकरा बनू द्या. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह चेन्नईच्या कलेला फुलू द्या, पर्यटनात वाढ होऊ द्या, गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होऊ द्या, श्रोत्यांनी अधिक नियमबद्ध होऊ द्या, मुलं आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ दे’, असंही त्यांनी लिहिलंय. मात्र ए. आर. रहमान यांच्या या पोस्टवर नेटकरी आणखी भडकले आहेत.

‘या संपूर्ण पोस्टमध्ये माफी कुठे आहे? थोडीतरी लाज बाळगा. तुम्हीसुद्धा या घटनेसाठी थोडेफार जबाबदार आहात. पण तुम्हाला माफी मागणंही कठीण जातंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘चेन्नईमध्ये कॉन्सर्टचं आयोजन करणारे तुम्ही एकटे नाहीत. तुमच्यापेक्षा चांगले कॉन्सर्ट याआधी आयोजित केले गेले. पण तुम्ही अशा कंपनीला बांधील आहात, जे योग्य रितीने कॉन्सर्ट आयोजित करू शकले नाहीत. त्याचं खापर आमच्या शहरावर फोडू नका’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला.