
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील बऱ्याच नवीन गोष्टी आता समोर येत आहेत. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासेही समोर येत आहेत.
सैफ अली खान हा एका मोठ्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. 16 जानेवारी रोजी सैफवर त्याच्या वांद्रे येथील घरात एका चोराने चाकू हल्ला केला होता. या हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर अनेक ट्विस्ट अँड टर्न आलेले पाहायला मिळत आहे. या प्रकरणाबद्दल रोज नवीन माहिती समोर येत आहे.
सैफ हल्ला प्रकरणात आरोपीच्या फिंगरप्रिंटबाबत नवी माहिती समोर
दरम्यान सैफ हल्ला प्रकरणात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सैफसह आरोपीचे कपडे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. एवढच नाही तर आरोपीच्या कपड्यांवरील रक्त सैफचे आहे की नाही हे तपासण्यासाठी सैफ आणि आरोपीच्या रक्ताचे नमुने आणि कपडे एफएसएलकडे पाठवण्यात आले आहेत. तर सैफच्या अपार्टमेंटमधून मिळालेले फिंगरप्रिंट आरोपीचे आहेत की नाही याचाही तपास सुरु आहे.
फिंगरप्रिंटस खरे की खोटे?
मात्र आता याचसंदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत दहिया आणि पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सैफ हल्ला प्रकरणातील अपडेटबाबत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे प्राप्त झाल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. मात्र ज्या रिपोर्टची सर्वजण वाट पाहत आहेत ते रिपोर्ट म्हणजे आरोपीचे फिंगरप्रिंटस.
पोलिसांची पत्रकार परिषदेत मोठी माहिती.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे फिंगरप्रिंटस संदर्भात अद्याप कुठलाही रिपोर्ट प्राप्त झालेला नाही. ते फिंगरप्रिंटस खरच आरोपीचे आहेत की अजून कोणाचे याचा खुलासा फिंगरप्रिंटसचे रिपोर्ट आल्याशिवाय होणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलं. तसेच या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग आहे का हे देखील अद्याप निष्पन्न झालेला नाही.
मात्र आरोपी ज्या ज्या लोकांच्या संपर्कात होता त्यांची चौकशी केली जात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. एवढच नाही तर रात्री 2 वाजून 47 मिनिटांनी सैफ अली खान रुग्णालयात पोहोचला होता याचे सीसीटीव्ही फुटेजसुद्धा मिळाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान सैफ अली खानने मुंबई पोलिसांसमोर त्याच्या हल्ल्यासंदर्भातील जबाब नोंदवला आहे. या प्रकरणाबाबत अजून कोणत्या नव्या गोष्टी समोर येतील हे आरोपीचे फिंगरप्रिंटसचे रिपोर्ट आल्यावर समजेल.