
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या ‘राइज अँड फॉल’ या शोला अखेर त्याचा विजेता मिळाला आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता अर्जुन बिलजानीने या शोचं विजेतेपद पटकावलं आहे. सूत्रसंचालक अशनीर ग्रोवरने ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्ये अर्जुनला विजेता म्हणून घोषित केलं. हातात ट्रॉफी घेतलेला अर्जुनचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच त्याच्या विजयाच्या क्षणाचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. शोमधून बाहेर पडल्यानंतर अर्जुनने पापाराझींसमोर फोटोसाठी पोजसुद्धा दिले आणि सर्वांचे आभार मानले.
या शोच्या अंतिम फेरीत अर्जुन बिजलानी आणि आरुष भोला यांच्यात चुरशीची लढत होती. आरुषला मात देत अखेर अर्जुनने ट्रॉफी पटकावली आहे. तर आरुष भोला या शोचा रनरअप ठरला. ‘बिग बॉस’ फेम अरबाज पटेल या शोमध्ये सेकंड रनर अप ठरला. याशिवाय या शोमध्ये धनश्री वर्मा, नयनदीप रक्षित आणि आकृती नेगी यांचाही समावेश होता. इंटर्नल वोटिंगच्या आधारे फिनालेमध्ये विजेत्याची निवड करण्यात आली. तेव्हा सर्वाधित मतं अर्जुन बिजलानीला मिळाली होती.
पापाराझींशी बोलताना अर्जुनने त्याच्या विजयाचं श्रेय पत्नी नेहा स्वामीला दिलं. “माझ्या विजयाचं खरं श्रेय माझ्या पत्नीला जातं. आता ट्रॉफी जिंकल्यानंतर मला फक्त माझ्या घरी जाऊन निवांत झोपायचं आहे. मला माझ्या मुलालाही कडकडून मिठी मारायची आहे”, अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला. ‘राइज अँड फॉल’चा विजेता ठरलेल्या अर्जुनला बक्षीस म्हणून 30 लाख रुपये मिळाले आहेत. त्यापैकी टॅक्स कापल्यानंतर अर्जुनने 28,10,000 रुपये घरी नेले आहेत.
‘राइज अँड फॉल’च्या पहिल्या सिझनचा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना 17 ऑक्टोबर 2025 रोजी पहायला मिळणार आहे. या फिनालेमध्ये भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह पुन्हा एकदा झळकणार आहे. एमएक्स प्लेयर आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा फिनाले स्ट्रीम होणार आहे.
विजेतेपद जिंकल्यानंतर अनेकांनी अर्जुनचं अभिनंदन केलं आहे, परंतु काहींनी त्याच्या विजेतेपदावरून टीकासुद्धा केली आहे. आरुष भोलाचे चाहते त्याच्यावर सर्वाधिक चिडले आहेत. कारण आरुष हा या शोचा खरा विजेता आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर काहींनी अशनीर गौरवरही टीका केली आहे. अशनीरची पत्नी अर्जुनला प्रमोट करत होती, म्हणून तो विजेता ठरल्याचं टीकाकारांनी म्हटलंय.