
Zubeen Garg : गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री मोठा जनसमुदाय जमला होता. आसामी गायक आणि ‘आसामचा आवाज’ म्हणून ओळखला जाणारा झुबीन गर्ग याचं पार्थिव शनिवारी रात्री गुवाहाटीत आणलं गेलं. शुक्रवारी सिंगापूरमध्ये लाइफ जॅकेटशिवाय समुद्रात पोहताना झुबीनचं निधन झालं होतं. त्याच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्रीपासूनच झुबीनचे चाहते गुवाहाटी विमानतळाबाहेर जमू लागले होते. मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा त्याचं पार्थिव दिल्लीहून एका विशेष विमानाने गुवाहाटीसला आणलं जाईल, अशी बातमी पसरली, तेव्हा जमावाने दोन बॅरिकेड्स तोडले आणि विमानतळाच्या टर्मिनलकडे धावण्यास सुरुवात केली. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला. काही लोकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या आणि पोलीस वाहनांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या कारवाईनंतर आणि काही चाहत्यांनी शांत होण्याचं आवाहन केल्यानंतर तिथली परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक चाहते झुबीन गर्गची लोकप्रिय गाणी गात, गिटार वाजवताना दिसले. झुबीनचं पार्थिव घेण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा आणि दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी विमानतळावर पोहोचले. झुबीन गर्गची पत्नी गरिमासुद्धा विमानतळावर उपस्थित होती.
रविवारी सकाळी झुबीनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पाडण्यात येतील. कुटुंबातील सदस्यांना आणि विशेषत: त्याच्या 85 वर्षीय वडिलांना पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी त्याच्या निवासस्थानी काही वेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर झुबीनचं पार्थिव अर्जुन भोगेश्वर बरुआ क्रीडा संकुलात ठेवण्यात येईल. अंत्यसंस्काराचं ठिकाण निश्चित करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना समुद्रात उडी मारल्यानंतर झुबीनला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असता शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता त्याचं निधन झालं. झुबीनचं ‘या अली’ हे गाणं तुफान गाजलं होतं. या गाण्यामुळे त्याला संपूर्ण देशभरात लोकप्रियता मिळाली होती. त्याच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं आहे.