Assi : बलात्कारसारखा संवेदनशील विषय; दमदार कथेचा मिळतोय फायदा, ‘अस्सी’च्या कमाईत वाढ

'अस्सी'ची सुरुवात जरी धीम्या गतीने झाली असली तरी दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चांगलीच वाढ झाली. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 60 ते 70 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली.

Assi : बलात्कारसारखा संवेदनशील विषय; दमदार कथेचा मिळतोय फायदा, अस्सीच्या कमाईत वाढ
तापसी पन्नू
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 23, 2026 | 7:49 AM

अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘अस्सी’ हा चित्रपट एका संवेदनशील मुद्द्यावर प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडण्यात यशस्वी ठरला आहे. पहिल्याच दिवशी सकारात्मक रिव्ह्यू आणि चांगली ‘माऊथ पब्लिसिटी’ होत असतानाही या चित्रपटाची सुरुवात धीम्या गतीने झाली होती. अनुभव सिन्हा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, ज्यांनी ‘मुल्क’, ‘आर्टिकल 15’, ‘थप्पड’ यांसारख्या सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट बनवले आहेत. अशा मुद्द्यांवरील चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर सहसा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. परंतु ‘अस्सी’ला प्रेक्षकांच्या सकारात्मक कमेंट्सचा फायदा मिळतोय. शुक्रवारी ‘अस्सी’ची सुरुवात सकारात्मक रिव्ह्यूजने झाली आणि अनेकांनी ‘आवर्जून पाहण्यालायक’ अशा शब्दांत त्याचं वर्णन केलं.

तापसीच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त एक कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. परंतु दमदार रिव्ह्यूज आणि कौतुकांचा फायदा शनिवारी पहायला मिळाला. शनिवारी सकाळी 9 वाजता ‘बुक माय शो’वर हा चित्रपट ट्रेंडिंगमध्ये होता. तर गेल्या 24 तासांत ‘अस्सी’चे जवळपास 17 हजार तिकिटं विकली गेली आहेत. रविवारी 9 वाजेपर्यंत 24 तासांत 28 हजार तिकिटं विकली गेली. ‘अस्सी’च्या तिकिट विक्रीत वाढ तर झालीच आहे, परंतु कलेक्शनमध्येही वाढता आलेख पहायला मिळतोय. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत 60 ते 70 टक्के वाढ झाली. दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये 1.60 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा थोडं अधिक वाढल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दोन दिवसांतील कमाईचा आकडा 2.60 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

मर्यादित स्क्रिन्सवर प्रदर्शित, गंभीर विषय, मर्यादित बजेट असलेल्या ‘अस्सी’साठी कमाईतील ही थोडीफार वाढसुद्धा फार महत्त्वाची आहे. ज्या काळात सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षक मिळण्यास अडचण येत आहे, अशा काळात ‘अस्सी’ला थिएटरमध्ये टिकून राहण्यासाठी अशीच उडी घेण्याची गरज आहे. बलात्कारासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर हा चित्रपट बनला आहे. रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वेग येईल, अशी आशा आहे.

या चित्रपटात तापसी पन्नू, कुमूद मिश्रा, झिशान अयूब, मनोज पाहवा, रेवती अशा दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘अस्सी’मध्ये मल्याळम अभिनेत्री कनी कुश्रुतीने बलात्कार पीडित परिमाची भूमिका साकारली आहे. कनी कुश्रुती हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Follow Us