मोठी बातमी! अखेर आता शरद पवार मैदानात, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, केल्या 17 मागण्या
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडे 17 मागण्या केल्या आहेत.

मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात पावसाभावी दुष्काळ पडला आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. राज्य सरकारकडून राज्यात दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडे 17 मागण्या केल्या आहेत. ‘महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे 17 मगाण्या केल्या अशी माहिती शरद पवार यांनी ट्विट करत दिली आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना पत्राद्वारे १७ मागण्या करत आहोत.
शेती व शेती व्यवसायासाठी घेतलेली सहकारी, राष्ट्रीयीकृत, अर्बन बँका व पतसंस्थांची कर्जमाफी,… pic.twitter.com/ETLr7phlCB
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 27, 2026
काय आहेत 17 मागण्या?
१) राज्यात वंचित राहिलेले तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावे.
२) संपूर्ण जमीन महसूल माफ करण्यात यावा.
३) कर्जमाफी झालेल्या तारखेनंतर आजतागायत ज्या शेतकऱ्यांनी शेती व शेती व्यवसायाशी निगडित घेतलेले सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी अर्बन बँका आणि पतसंस्था तसेच सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, आदिवासी विभागाचे वैयक्तिक कर्ज, तसेच फळबागांसाठी घेतलेले कर्ज आणि महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम संपूर्णपणे माफ करण्यात यावी.
४) शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची सर्व वीज बिले माफ करण्यात यावीत.
५) दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक तसेच वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची वसतिगृह फी आणि मेस फी संपूर्णपणे माफ करण्यात यावी.
६) रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्याचे निकष शिथिल करून, मागेल त्या ठिकाणी तीन किलोमीटरच्या परिसरात तातडीने रोजगाराची कामे सुरू करण्यात यावीत.
७) पिण्याच्या पाण्याच्यासाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्यासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसिलदारांना देऊन त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी.
८) टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडित करू नये. तसेच दुष्काळग्रस्त भागात कोणत्याही प्रकारचे लोडशेडिंग करण्यात येऊ नये.
९) शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ किलो धान्य सरसकट मोफत देण्यात यावे.
१०) दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व शेतमजूरांकडील पशुधनासाठी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात यावे.
११) जलसंधारणाची कामे सुरू करण्यासाठी सध्याचे निकष शिथिल करून विशेष निधी उपलब्ध करून देत ही कामे तातडीने सुरू करण्यात यावीत.
१२) महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये तसेच शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान तातडीने त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावे.
१३) दुष्काळामुळे फळबागा, केळी, ऊस व भात यांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.
१४) ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाद्वारे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात तातडीने आदेश निर्गमित करण्यात यावेत.
१५) शेतकरी अथवा शेतमजूर यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रलंबित असलेली थकीत देयके व त्यावरील अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे.
१६) दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने वर्ग करण्यात यावा.
१७) दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात यावी व आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात यावेत. तसेच या अधिवेशनात झालेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करून, नुकसानग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना दसरा व दिवाळीपूर्वी आवश्यक आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात यावी.
वरीलप्रमाणे केलेल्या मागण्यांची शासनामार्फत तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. दुष्काळामध्ये होरपळलेल्या शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, ही विनंती. अशा मागण्या पत्रात करण्यात आल्या आहेत.
