कामाच्या बदल्यात अश्लील मागणी, त्या घाणेरड्या Email बद्दल ‘क्रिमिनल जस्टीस’ फेम अभिनेत्रीचा खुलासा

'क्रिमिनल जस्टीस 4' या वेब सीरिजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री बरखा सिंह नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. एकाने ई-मेलद्वारे तिच्याकडे अश्लील मागणी केली होती, असा आरोप बरखाने केला आहे.

कामाच्या बदल्यात अश्लील मागणी, त्या घाणेरड्या Email बद्दल क्रिमिनल जस्टीस फेम अभिनेत्रीचा खुलासा
बरखा सिंह
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 29, 2025 | 1:59 PM

‘क्रिमिनल जस्टिस 4’ या वेब सीरिजमधून अभिनेत्री बरखा सिंह प्रकाशझोतात आली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बरखा तिच्या प्रवासाबद्दल, करिअरबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास काही सोपा नव्हता, असं ती म्हणाली. बरखाला एका दाक्षिणात्य चित्रपटाची ऑफर मिळाली होती. परंतु त्या बदल्यात तिला तडजोड करण्यास सांगण्यात आलं होतं. एका ई-मेलद्वारे बरखाकडे ही मागणी करण्यात आली होती. इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचे अनेक अनुभव कलाकारांना येत असतात. काहीजण त्यावर मोकळपणे बोलतात आणि खुलासा करतात. बरखानेही तिचा अनुभव स्पष्टपणे सांगितलं.

याविषयी ती मुलाखतीत म्हणाली, “मी थेट कधी कास्टिंग काऊचचा अनुभव घेतला नाही. परंतु मला तसे ई-मेल आले होते. ई-मेलद्वारे माझ्याकडे शरीरसुखाची मागणी झाली होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून मला ऑफर आली होती आणि आजपर्यंत माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. त्यात त्या व्यक्तीने लिहिलं होतं की तुला इतक्या दिवसांचं शूटिंग करावं लागेल. तुझे वायटल्स 36 असायला हवेत. त्याचसोबत तुला कॉम्प्रमाइज (तडजोड) करायलाही लागेल. तुम्ही जर एखाद्याला लेखी स्वरुपात या गोष्टी देत असाल, म्हणजे तुम्हाला कास्टिंग काऊचशी काहीच समस्या नाही.”

संबंधित मेलमध्ये त्या व्यक्तीने कोणासोबत तडजोड करावी लागेल, याविषयी कोणत्याच नावाचा उल्लेख केला नव्हता, असंही बरखाने स्पष्ट केलं. “माझ्यासोबत ही घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. परंतु सुदैवाने मला समोरासमोर कधी असा अनुभव आला नाही. मी कास्टिंग काऊचची शिकारसुद्धा झाले नाही. अशा प्रकारच्या स्थितीत मी अडकू नये, यासाठी मी पूर्ण प्रयत्न करते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अशा गोष्टी उघडपणे घडतात. माझं करिअर खराब करू शकतील अशा परिस्थिती टाळण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. प्रत्येकाने काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावेत,” असं ती पुढे म्हणाली.

बरखा सिंहने ‘इंजीनिअरिंग गर्ल्स’, ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’, आणि माधुरी दीक्षितच्या ‘मजा मा’ या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच ती ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत झळकली होती. परंतु ‘क्रिमिनल जस्टिस 4’मध्ये अभिनेता पंकज त्रिपाठीची सहाय्यक वकील शिवानी माथूरच्या भूमिकेतून तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.