प्रसिद्ध अभिनेत्यासोबत फोटो क्लिक केल्यानंतर चाहत्याकडून संतापजनक कृत्य; व्हिडीओ व्हायरल

भाग्यलक्ष्मी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेत्री आकाश चौधरीसोबत नुकतीच एक घटना घडली. एका कथित चाहत्याने त्याच्यावर पाण्याची बाटली फेकली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी संताप व्यक्त केला.

प्रसिद्ध अभिनेत्यासोबत फोटो क्लिक केल्यानंतर चाहत्याकडून संतापजनक कृत्य; व्हिडीओ व्हायरल
Bhagya Lakshmi actor Akash Choudhary
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 16, 2023 | 4:14 PM

मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अनेकदा त्यांच्यासोबत सेल्फी किंवा फोटो क्लिक करण्यासाठी चाहते कलाकारांभोवती घोळका करून उभे राहतात. अशावेळी सेलिब्रिटींना ती परिस्थिती अत्यंत संयमाने आणि समजूतदारपणाने हाताळावी लागते. मात्र काही वेळा चाहते सेलिब्रिटींसोबत चुकीचं वागताना दिसतात. असंच काहीसं ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता आकाश चौधरी याच्यासोबत घडलं आहे. एका कथित चाहत्याने आकाशवर पाण्याची बाटली फेकली. ही घटना वापराझींसमोर घडली आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर सर्वसामान्य नेटकऱ्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडिओच्या सुरुवातीला आकाशसोबत काही मुलं सेल्फी क्लिक करण्यासाठी उभे असतात. आकाशसुद्धा त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करतो. त्याचवेळी एक मुलगा हातात पाण्याची बाटली घेऊन आकाशच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न करतो. तितक्यात सावध झालेला आकाश त्याला थांबवत विचारतो, “भावा हे तू काय करतोयस?” त्यावेळी तो संबंधित चाहता तिथेच थांबतो. मात्र नंतर सेल्फी क्लिक झाल्यावर आकाश जेव्हा रस्त्यावर पुढे चालू लागतो, तेव्हा तो चाहता मागून प्लास्टिकची पाण्याची रिकामी बाटली त्याच्या दिशेने भिरकावतो. ही बाटली आकाशच्या पाठीला लागते. तो दचकून मागे वळून पाहतो आणि संबंधित चाहत्याला प्रश्न विचारतो.

पहा व्हिडीओ

या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘ते सेलिब्रिटी आहेत, पब्लिक प्रॉपर्टी नाही’ असे एकाने लिहिलंय. तर ‘अशा मुलाला योग्य धडा शिकवलाच पाहिजे,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. सेलिब्रिटीच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीसोबत असं वागणं चुकीचं आहे, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. कॉमेडियन भारती सिंगनेही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये धक्कादायक हावभावाचे इमोजी पोस्ट केले आहेत.

कोण आहे आकाश चौधरी?

आकाश चौधरी हा ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतून घराघरात पोहोचला. याशिवाय तो ‘डेटिंग इन द डार्क’ आणि ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला 10’मध्येही झळकला होता. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत आकाश त्याच्या करिअरविषयी व्यक्त झाला होता. “मी असे बरेच शोज नाकारले आहेत ज्यामध्ये मला काही अशा गोष्टी करण्यास सांगितले गेले, जे मला करायचे नव्हते. जर मी माझ्या नीतीमूल्यांशी तडजोड केली असती तर कदाचित मी माझ्या करिअरमध्ये आता चांगल्या ठिकाणी असतो. पण मला माझ्या निर्णयांचा पश्चाताप नाही”, असं तो म्हणाला.