भार्गवी चिरमुलेंचं 6 वर्षांनंतर कमबॅक; ‘या’ मालिकेतून येणार भेटीला

अभिनेत्री भार्गवी चिरमुले सहा वर्षांनंतर मालिकेतून कमबॅक करत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ती नकारात्मक भूमिका साकारणार आहे. ही मालिका कोणती आणि त्यात भार्गवीची भूमिका नेमकी काय आहे, ते जाणून घ्या..

भार्गवी चिरमुलेंचं 6 वर्षांनंतर कमबॅक; या मालिकेतून येणार भेटीला
भार्गवी चिरमुले
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2026 | 3:42 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील आगामी मालिका ‘मराठी मिडियम’ची सध्या प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले सहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर कमबॅक करणार आहेत. या मालिकेत भार्गवी निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारणार असून विशाखा शुक्रे असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आपल्या मतांवर ठाम असलेली विशाखा आपल्या आजूबाजूच्या जगाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहते. विशाखा एका मोठ्या बिझनेस फॅमिलीमधून आलेली आहे. तिचा नवरा सुस्वभावी असला तरी कर्तृत्वाच्या बाबतीत कमी पडतो, हे तिने फार पूर्वीच ओळखलं होतं. त्यामुळे आपल्या मुलाने वडिलांसारखं होऊ नये, यासाठी तिने त्याच्या संगोपनात कोणतीही कसर सोडलेली नाही.

विशाखाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. ब्रँडेड नसलेल्या गोष्टींबद्दल तिला चीड आहे. अस्वच्छपणा तिला अजिबात सहन होत नाही. टेबल मॅनर्स आणि एटिकेट्स याबद्दल ती सहज रकाने लिहू शकते. तिचा ठाम विश्वास आहे की, ‘जे जे परदेशी, ते ते चांगलं.’ त्यामुळे जुन्या चालीरीती आणि परंपरांना तिच्या लेखी फारसं महत्त्व नाही.

Loading...

या भूमिकेबद्दल भार्गवी चिरमुले म्हणाली, “स्टार प्रवाहसोबत सहा वर्षांनंतर पुन्हा जोडलं जाणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. स्टार प्रवाह वाहिनी सातत्याने वेगवेगळे विषय मालिकांच्या माध्यमातून हाताळत असतात. ‘मराठी मिडियम’ची कथा आणि विशाखा शुक्रे हे पात्र माझ्यासाठी खूप वेगळं आहे. आतापर्यंत मी निगेटिव्ह भूमिका फारशा साकारलेल्या नाहीत. त्यामुळे हे पात्र साकारताना कस लागतोय. विशाखाची स्वतःची एक विचारसरणी आहे. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तिचा वेगळा दृष्टिकोन आहे. या व्यक्तिरेखेतून माझा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.” ‘मराठी मिडियम’ ही नवीन मालिका संध्याकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लवकरच सुरू होणाऱ्या मराठी मिडियम मालिकेची घोषणा होताच चर्चा रंगली ती मालिकेच्या मुख्य नायिकेची. सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रद्धा पवार या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. श्रद्धाचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आणि संघर्षमय राहिला आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या श्रद्धाने शालेय जीवनात विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. तिच्या अभिनयाला आणि व्यक्तिमत्त्वाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत गेला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us