जेवण बनवू, मुलांना जन्माला घालू.. वजनावरून खिल्ली उडवताच पतीवर भडकली भारती सिंह; पती-पत्नीचा वाद चव्हाट्यावर
Bharti Singh: कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आधी हर्ष भारतीच्या वजनाची खिल्ली उडवतो, त्यानंतर ती नाराज होऊन असं काही बोलते, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावतात.

कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांची जोडी छोट्या पडद्यावर नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. दोघांचा विनोद, एकमेकांची टेर खेचण्याची स्टाइल आणि मजेशीर केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच आवडते. आता त्यांच्या ‘इंडियन गेम शो विथ भारती अँड हर्ष’चा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रोमोमध्ये हर्षने भारतीच्या वजनावर केलेल्या मस्करीमुळे दोघांमध्ये भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. प्रोमोमध्ये हर्ष स्पर्धकांना भारतीचं वजन ओळखायला सांगतो. यावेळी काही जण भारतीचं वजन 86, 88 तर काही जण 91 किलो असल्याचं सांगतात. यावर प्रिन्स भारतीला म्हणतो की, 91 किलो सांगणाऱ्याला तू एका मुक्क्यात खाली पाडू शकतेस. यानंतर भारती आपल्या नेहमीच्या विनोदी अंदाजात ‘सुंदर मुलींमध्ये अक्कल कमी असते’ अशी मिश्कील टिप्पणी करते.
यानंतर खरी गंमत सुरू होते, जेव्हा भारती हर्षला तिचं वजन किती आहे असं विचारते. हर्ष अंदाज लावत तिचं वजन 67 ते 70 किलोच्या आसपास असल्याचं सांगतो. हे ऐकताच भारती त्याच्यावर नाराज होते. विशेष म्हणजे, आदल्याच दिवशी तिचं वजन तपासण्यात आलं होतं, तरीही हर्षला तिचं वजन माहिती नसल्याने ती त्याची चांगलीच फिरकी घेते. भारती पुढे तिच्या खास विनोदी शैलीत म्हणते की, “हर्षचा उद्देश फक्त मुलं होऊ द्यायचा होता; घरात सगळी कामं, स्वयंपाक आणि मुलांची जबाबदारी तिचीच आहे, पण तिचं वजन किती आहे याकडे मात्र त्याचं लक्ष नाही.”
पहा व्हिडीओ
भारतीची ही टिप्पणी ऐकून हर्षही मागे हटत नाही. तो भारतीला वजनाच्या मशीनवर उभं राहण्याबाबत चिडवत आणखी विनोद करतो. भारतीदेखील त्याला भन्नाट प्रत्युत्तर देताना दिसते. त्यामुळे हा प्रसंग प्रत्यक्षातील भांडणापेक्षा दोघांच्या नेहमीच्या कॉमेडी केमिस्ट्रीचा भाग असल्याचं प्रोमोवरून दिसतं. ‘इंडियन गेम शो विथ भारती अँड हर्ष’चा प्रीमियर 24 ऑगस्ट 2026 रोजी झाला असून या शोमध्ये सेलिब्रिटी विविध मजेदार गेम्स, फिजिकल टास्क आणि स्किल-बेस्ड खेळ खेळताना दिसत आहेत.