
सर्वांत लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’चा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दुसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना कॉमेडीचं गँगवॉर अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, गौरव मोरे आणि प्रियदर्शन जाधव यांचा समावेश असेल. परंतु भाऊ कदम आणि निलेश साबळे या नव्या सिझनमध्ये नसल्याने प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर अनेकांनी त्यावरून प्रश्न विचारला होता. अखेर यामागचं खरं कारण समोर आलं आहे. खुद्द भाऊ कदमने हे कारण सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेवर काही आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना भाऊ कदमने ‘चला हवा येऊ द्या 2’मध्ये नसण्यामागचं कारण सांगितलं होतं. चित्रपटामुळे शोसाठी नकार दिल्याचं निलेश साबळेनं स्पष्ट केलं होतं. हेच कारण भाऊ कदमनेही सांगितलं होतं. सध्या तोसुद्धा एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शोसाठी तारखा उपलब्ध नसल्याने त्याने ‘चला हवा येऊ द्या 2’ची ऑफर स्वीकारली नाही. भाऊ कदम लवकरच ‘प्रेमाची गोष्ट 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या सिझनमध्ये धमाकेदार स्किट्स, गँग लॉर्ड्समध्ये रंगलेली बोलीची स्पर्धा, खास सेलिब्रिटींची हजेरी आणि उत्साही प्रेक्षकांच्या सहभागासह एक हटके मनोरंजनचा तडका असणार आहे. सगळे विनोदवीर आता गँग लॉर्ड्सच्या भूमिकेतून नव्या कलाकारांना मार्गदर्शन करतील, त्यांना प्रशिक्षित करतील आणि एक धमाकेदार विनोदी टीम तयार करतील. या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत खांडकेकर सांभाळणार आहे.
प्रत्येक भागात गँग लॉर्ड्स म्हणजेच पाच मेंटॉर्सचं एक विशेष विनोदी सादरीकरण होईल, ज्याने प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. त्यासोबतच महाष्ट्रभरातून आलेले 25 विनोदी कलाकार महाराष्ट्राच्या मनोरंजनाचा विडा हाती घेणार आहेत. या नव्या सिझनचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी सूत्रसंचालक निलेश साबळे यांची कमतरता जाणवणार, अशाही भावना व्यक्त केल्या होत्या. तर भाऊ कदमसुद्धा या नव्या सिझनमध्ये हवा होता, असंही काहींनी म्हटलं होतं.