Bhoot Bangla: ‘भूत बंगला’चा पहिला रिव्ह्यू समोर; कसा आहे अक्षय कुमार-प्रियदर्शनचा चित्रपट?

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी या चित्रपटाला पाच पैकी चार स्टार्स दिले आहेत. एकंदरीत हा चित्रपट कसा आहे, याविषयी त्यांनी काय म्हटलंय ते जाणून घ्या..

Bhoot Bangla: भूत बंगलाचा पहिला रिव्ह्यू समोर; कसा आहे अक्षय कुमार-प्रियदर्शनचा चित्रपट?
bhoot bangla
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 16, 2026 | 9:23 PM

अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘भूत बंगला’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आजपासून म्हणजेच 16 एप्रिलपासून त्याचे पेड प्रिव्ह्यू सुरू आहेत. ‘भूत बंगला’चा पहिला रिव्ह्यूसुद्धा समोर आला आहे. चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी या चित्रपटाला पाचपैकी चार स्टार दिले आहेत. यावरूनच हा चित्रपट किती दमदार असेल, याचा अंदाज येतो. अक्षय कुमारचा हा चित्रपट अत्यंत मनोरंजक असल्याचं त्यांनी म्हटलंय. ‘भूत बंगला’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भूत आणि खरे कॅरेक्टर्स यांच्यातील अनोखं नातं मजेशीररित्या दाखवलं आहे. चित्रपटात भीती आणि कॉमेडी यांचा एक असा ताळमेळ आहे जो तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो, असं रमेश बाला यांनी म्हटलंय. अक्षय कुमारने त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम परफॉर्मन्स दिल्याचंही त्यांनी लिहिलं आहे.

अक्षयला विनोदाची अचूक टायमिंग या चित्रपटात साधता आली आहे. तर परेश रावल आणि राजपाल यादव यांनी सुद्धा दमदार सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या कॉमिक केमिस्ट्रीने या चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवलं आहे. या चित्रपटाच्या मध्यंतरात येणारा एक क्षण अंगावर काटा आणतो. त्यानंतर हळूहळू मिस्ट्रीवरून पडदा उचलण्यात येतो. चित्रपटाची कथा शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवते. हॉरर, कॉमेडी आणि सस्पेन्स यांचा ताळमेळ साधून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. चित्रपटातील इतर भूमिकांनीही चांगलं काम केलं आहे. जर तुम्हाला ‘भुल भुलैया’ हा चित्रपट आवडला असेल तर त्याच्या काही जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात. एकंदरीत हा चित्रपट मनोरंजनाचा जबरदस्त अनुभव देतो,’ अशा शब्दांत रमेश बाला यांनी समीक्षण केलं आहे.

अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटामुळे त्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता हा चित्रपट 17 एप्रिल रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच तब्बू, वामिका गब्बी, राजपाल यादव आणि परेश रावल यांसारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत.

Follow Us