
‘बॉर्डर’ हा चित्रपट म्हटलं की ‘संदेसे आते है’ हे गाणं आपसूकच कानात वाजू लागतं. जे. पी. दत्ता यांचा हा चित्रपट आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता ‘बॉर्डर 2’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना त्यात ‘संदेसे आते हैं’ हे गाणं आवर्जून असेल, याची खात्री निर्मात्यांनी केली होती. परंतु प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी हे गाणं लिहिण्यास स्पष्ट नकार दिला होता. हे एक प्रकारचं सर्जनशील दिवाळखोरीसारखं वाटतं, असं म्हणत त्यांनी निर्मात्यांवर टीका केली होती. तीच गाणी रिक्रिएट करण्यापेक्षा नवीन गाणी लिहा, असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यावर आता चित्रपटाचे निर्माते आणि टी-सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर आता निर्माते भूषण कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संदेसे आते हैं’ हे गाणं ‘बॉर्डर’च्या सीक्वेलमध्ये ठेवणं का गरजेचं होतं, यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे. चित्रपटाच्या प्रमोशनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात भूषण कुमार म्हणाले, “मला असं वाटतं की हा चित्रपट दोन गोष्टींशिवाय किंवा असं समजा तीन गोष्टींशिवाय बनू शकला नसता. एक म्हणजे ‘बॉर्डर’ हे टायटल, दुसरं म्हणजे सनी देओल सर आणि तिसरं म्हणजे संदेसे आते है हे गाणं. त्यामुळे सुरुवातीपासूनच आमच्या डोक्यात ही गोष्ट होती की या सीक्वेलमध्ये ‘संदेसे आते है’ हे गाणं ठेवायचंच.”
भूषण कुमारने पुढे सांगितलं, “संदेसे आते हैं या गाण्याचे बोल परिस्थितीनुसार बदलण्यात आले आहेत. जी कहाणी आम्ही दाखवणार आहोत, ती ‘बॉर्डर’च्या रीक्रिएशनची कहाणी नाही, तर 1971 च्या युद्धाशी संबंधित दुसरी कथा आहे. आम्ही दुसऱ्या सैनिकांची कथा यात दाखवली आहे. त्यामुळे गाण्याचे बोलसुद्धा त्यावर आधारित लिहिण्यात आले आहेत. म्हणूनच आम्ही या गाण्याचे बोल मनोज मुंतशीर यांच्याकडून लिहून घेतले आहेत.”
“त्यांनी मला चित्रपटासाठी गाणं लिहायला सांगितलं होतं, परंतु मी त्यांना नकार दिला. खरोखर हे एक प्रकारचं सर्जनशील दिवाळखोरीसारखं वाटतं. तुमच्याजवळ एक जुनं गाणं आहे, जो आधी तुफान हिट झाला होता आणि आता त्यात तुम्ही थोडंसं काहीतरी जोडून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणू इच्छिता. एकतर नवीन गाणी बनवा किंवा आता तुम्ही त्या स्तराचं काम करू शकत नाही ही गोष्ट स्वीकारा”, अशा शब्दांत अख्तर यांनी सुनावलं होतं.