
‘बिग बॉस 19’ या शोचा सर्वांत रंजक भाग म्हणजे ‘वीकेंड का वार’. या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खान त्याच्या खास अंदाजात स्पर्धकांशी गप्पा मारतो, काहींची शाळा घेतो तर काहींसोबत थट्टा-मस्करी करतो. या एपिसोडदम्यान घरातून एका स्पर्धकाला कायमचं घराबाहेर जावं लागतं. नेहमीप्रमाणेच यंदाच्या सिझनचाही पहिला ‘वीकेंड का वार’ एपिसोड धमाकेदार होता. सलमानने घरातील सदस्यांना दुसऱ्या आठवड्यापासूनच अॅक्टिव्ह मोडवर येण्याचा सल्ला दिला आहे. तर कॉमेडियन प्रणित मोरेची त्याने चांगलीच शाळा घेतली. तान्या मित्तल आणि सलमान यांच्यातील संवादसुद्धा मजेशीर होता.
‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमानने प्रत्येक स्पर्धकासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. घरातील सोळा सदस्यांपैकी त्याला एकाला एलिमिनेट करायचं होतं. पहिल्याच आठवड्यात गौरव खन्ना, तान्या मित्तल, अभिषेक बजाज, मृदुल तिवारी, प्रणित मोरे, झीशान कादरी, नतालिया आणि निलम यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व सदस्य एलिमिनेशन राऊंडमध्ये सुरक्षित राहिले. म्हणजेच या आठवड्यात कोणीच घराबाहेर गेलं नाही.
बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडपासून तान्या मित्तल आणि अशनूर कौर या दोघींमध्ये शीतयुद्ध पहायला मिळतंय. वीकेंड का वार एपिसोडमध्ये तान्या आणि अशनूरला वर्डिक्ट रुममध्ये पाठवण्यात आलं होतं. या दोघींपैकी स्वत:ला कोण अधिक वरचढ समजतं, यावरून घरातील इतर सदस्यांना वोटिंग करण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर सलमानने तान्याला विनम्रपणे वागण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात भांडण झाल्यानंतर कुनिका सदानंदने तिची कॅप्टन्सी सोडली. घरातील दुसऱ्या कोणाला तरी कॅप्टन बनवण्याची विनंती तिने बिग बॉसकडे केली. ‘बिग बॉस 19’ हा शो जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 9 वाजता आणि कलर्स टीव्हीवर रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
कुनिका सदानंद आणि इतर सदस्यांमधील मतभेदांमुळे घरातील समीकरणे वेगाने बदलली. असभ्यतेचा आरोप झाल्यानंतर कुनिकाने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला. आधी बसीर आणि कुनिका यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यानंतर कुनिकाने फरहानाशीही भांडण केलं. यानंतर घरातील तणाव वाढला. कुनिकाच्या स्वभावामुळे घरातील संघर्ष वाढल्याचं मत अमाल मलिकने मांडलं होतं.