Bigg Boss 20: ‘बिग बॉस’मधील आश्चर्यकारक एलिमिनेशन; या स्पर्धकाचा संपला खेळ, समोर आलं कारण
Bigg Boss 20: बिग बॉस 20 मधून आणखी एक स्पर्धक घराबाहेर पडला आहे. लोकप्रिय अभिनेत्याचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. हा स्पर्धक कोण आहे, ते जाणून घ्या..

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’च्या घरात दर आठवड्याला नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. स्पर्धकांमधील वाद, मैत्री, गटबाजी आणि बदलती समीकरणं यामुळे हा शो चांगलाच चर्चेत आहे. आता या शोमधून आणखी एका लोकप्रिय स्पर्धकाचा प्रवास संपल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेता आसिफ खान याला कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर पडावं लागल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून तो घरातील वादांमुळे चर्चेत होता. त्याच्या एक्झिटच्या बातमीनंतर सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
कमी मतांमुळे आसिफ खानचा पत्ता कट?
या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी अनेक स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यामध्ये आसिफ खान, स्काउट ओपी, लव्ह गिल, आम्रपाली दुबे, गुल्लू आणि कनिका मान यांचा समावेश होता. या सर्व स्पर्धकांपैकी आसिफला सर्वात कमी मतं मिळाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपल्याची चर्चा आहे. प्रेक्षकांना वीकेंडच्या एपिसोडमध्ये याबाबत स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.
काझी तौकीरसोबतचा वाद पडला महागात?
आसिफ खान अलीकडेच सहस्पर्धक काझी तौकीरसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आला होता. दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीची दखल वीकेंडच्या एपिसोडमध्ये होस्ट रोहित शेट्टी यांनी घेतली होती. रोहित यांनी आसिफला त्याच्या वागण्याबद्दल जाब विचारला. काझीने आपल्याला दुखावणारी वक्तव्यं केली होती आणि आपला कोणालाही त्रास देण्याचा हेतू नव्हता, असं आसिफने स्पष्टीकरण दिलं. मात्र, रोहित यांनी आसिफवर काझीला मुद्दाम चिथावणी दिल्याचा आरोप केला. या प्रसंगामुळे आसिफच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
आसिफच्या एलिमिनेशनची बातमी समोर येताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला. काही नेटकऱ्यांनी त्याच्या बाहेर जाण्याचं स्वागत केलं, तर काहींनी त्याच्या खेळावर टीका केली. एका युजरने ‘हा तर खूप मोठा अभिनेता होता ना!’ अशी उपरोधिक टिप्पणी केली. तर दुसऱ्याने ‘योग्य रिअॅलिटी चेक मिळाला’ असं म्हटलं. आणखी एका युजरने ‘गुल्लू आणि कनिकाच्या मैत्रीने आसिफचा खेळच संपवला’ अशी प्रतिक्रिया दिली. काही चाहत्यांनी तर ‘आखिरकार गुटखा चाचांचा खेळ संपला’ असं म्हणत त्याची खिल्ली उडवली.
‘पंचायत’मधील गणेश म्हणून मिळाली लोकप्रियता
आसिफ खानने अनेक लोकप्रिय वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. ‘पंचायत’मधील गणेश या भूमिकेमुळे तो विशेष लोकप्रिय झाला. त्याचा ‘गजब बेइज्जती है’ हा संवादही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. याशिवाय ‘मिर्झापूर’ आणि ‘पाताळ लोक’ यांसारख्या वेबसीरिजमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता आसिफच्या एक्झिटनंतर बिग बॉसच्या घरातील समीकरणं कशी बदलणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.